Sunday, June 7, 2020

जाई जुईचा गंध मातीला



पाच वर्ष मी आतुरतेने वाट पहात असलेली बागेतली जुई गेल्या आठवड्यात बहरली. कवयित्री असते तर सुरेख कविता केली असती त्या बहरण्यावर इतकी हरखले होते तो बहर पाहून. उमलणाऱ्या कळ्या अंगभर लेवून जणू ते झाड मला विचारत होत , खुष का आता?  चहा पाणी, खाणं तिथे वेलीजवळच बसून करत होतो त्यावरून तिच्या लक्षात आलंच असेल,  नुसतं खूष नाही तर वेडी झालीय मी.

14 वर्ष राणीच्या निसर्गरम्य देशात आहोत.हिरवीगार वनराई चहुकडे पसरली आहे. ओसाड माळरान पहिलीच नाहीत इथे. उन्हाळ्यात  विविध प्रकारची फुलं फुलतात. हिरव्या गार गवतावर नाजूक पिवळी , पांढरी फुले तर अतिशय मोहक दिसतात.  सर्व घरांच्या पुढील अंगणात रंगांची उधळण असते, अनेक प्रकाराची गुलाब ताठ मानेने डोलत असतात. इथल्या गुलाबांचा रंग खूप वेगळा भासतो भारतातल्या गुलाबांपेक्षा. मूळ दिलेला रंग अजिबात उडालेला नसल्यासारखा. गडद लाल, पिवळा शार. भारता इतका उन्हाचा कडाका नाही म्हणून असेल कदाचित. पण त्यामुळेच त्याला सुवास ही नसतो. खूपच इथल्या लोकांसारख भासतं हे मला.
दिसायला अतिशय मोहक असतात पण तरी काहीतरी उणीव असते... माणुसकी नसते असं नाही पण ती आपुलकी कोरडी भासते. जोपर्यंत मला काही तोशिश पडत नाही तोपर्यंत मी जमेल ती मदत करणार . अर्थात याला अपवाद ही आहेत बरं का. जसं इथल्या बहुतांशी फुलांना वास नसतो पण honey suckle  सारखी वेल आहेच जिला मंद सुगंधी फुले येतात. सुवासिक लीली फुलते दारी, अगदी तसे. बरीच स्थानिक माणसं तशीही भेटली. नाती वाढवणारी, त्यातला ओलावा जपणारी.

पण हा घरच्या जूईचा वास मात्र थेट भारतात नेत होता. कुठे कुठे फिरवत होता, कित्येक जवळच्या माणसांची आठवण देत होता. मन हळवं करत होता. फुलाचा एवढासा जीव पण ते  असलेलं सारं कसं उधळून देत. हातच राखून नाही तर असेल तेव्हढा सुगंध उधळतात. त्यामुळेच ती खेचतात मला. सगळी कामधाम सोडून त्यांच्या नादी लागते मी. वाऱ्याबरोबर पसरणारा तो गंध वेड लावतो.  सतत तो गंध बरोबर रहावा म्हणून गजरा केला मी कित्येक वर्षांनी. देवाला वाहिली. घरभर घमघमाट होता त्या वासाचा. बरीच फुलं झाडावरच ठेवली.. त्यांचाही थाट बघण्यासारखा होता.

 भारतातील पांढऱ्या रंगाच्या फुलांशी माझं जरा विशेष सख्य आहेच. जाई,जुई,मोगरा,सायली, मदनबाण, चमेली, निशिगंध,  सोनटक्का, कुंदी कित्ती असतात... असतात दिसायला नाजूक, गंध  मात्र आसमंत भरून टाकणारा. कोकणातल्या प्रथेप्रमाणे मोठं असेल तर एखादं फुल डोक्यात माळल तर दुनियेतील भलेभले परफ्यूम फिके पडतील असा सुवास दरवळतो तुम्ही जाल तिथे . छोटी फुले गजरा करून केसात माळायची. त्या वासाने एका धुंदीत  वावरत असतो आपण. लहान असताना बांद्याच्या घरातील परस दारात खूप फुलांची झाडं होती. कोरांती, अबोली, मोगरा, kundi. मी दोरा घेऊनच kundi किंवा मोगऱ्याच्या झाडांशी जायची. एक एक फुल काढून दोर्यात तिथेच गुफायाच आणि तो गजरा माळून शाळेत जायचं. हो, तेव्हा शाळेत गजरे फुलं चालायची.  अख्खा दिवस तो सुवास लेवून वावरायचं.

लातूरच्या आत्याकडे जाईचा वेल होता. खाली जमिनीत लावलेला पण गच्चीत फुलं काढता यायची इतका फोफावले ला. पाऊस सुरू झाला की त्याला बहर यायचा. झालं , माझा बराचसा वेळ गच्चीत त्या वेली भोवती जायचा.आता कुठेही टपोरी फुललेली जाई आणि सुगंध आला की मी लातूरला ' रसिक ' च्या गच्चीत पोचते.

लहानपणी जायचो तेव्हा सांगलीच्या काकांच्या घरी बाहेरून जिना होता. घरात जायला या जिन्यावरून जावं लागे. त्या जिन्यावर मदन बाणाची वेल होती. त्यांच्या वासाने मी तेव्हाही तशीच जिन्यात जास्त वेळ घालवत असे. ते घर काकांनी सोडून जमाना उलटला पण ते दृश्य आणि तो सुगंध अजुन मनात आहे.

पुण्यातल्या आत्याच्या अंगणा तील पारिजात पण तितकाच आवडीचा माझ्या. किती नाजूक फुल पण अतिशय देखणी, आणि मंद सुगंध तर जीवघेणा. देवाला वाहण्यासाठी ही फुलं परडीत गोळा करताना नाजूक हाताने वेचावी लागत.  एखादं फुल चुकून जरी कुस्करल गेलं तर त्याच्या देठाचा केशरी रंग बोटं रंगवत. तेही आवडेपण नको वाटायचं. अजूनही स्वप्नात ' पथिक ' आणि तो पारिजातक येतो माझ्या.

कोकणात येणारं अजुन एक वेड फुल म्हणजे सुरंगी. त्याचं झाड मोठं असतं पण ठिसूळ. त्यावर चढून फुलं काढली तर झाड मोडून आपण धडपडायची शक्यताच जास्त.  त्या पिवळ्या फुलांचा गंध इतका विलक्षण असतो की माणसं काही तरी शक्कल लढवून ती फुलं काढतात. बांद्याच्या बाजारात दिसला की आम्ही हमखास आणायचो सुरंगीचो वळेसार ( गजरा)

बकुळीची फुलं राहिली की. ओवळी म्हणतात त्याला कोकणात. त्या झाडाखाली भुतं असतात म्हणून तिकडे जाऊ द्यायचे नाहीत आजूबाजूची माणसं. पण मी कित्येकदा जाऊन ती फुलं वेचून यायची. मस्त माळ करायची त्याची नारळाच्या झावळीच्या केलेल्या दोऱ्यात.

या सर्व फुलांचे वास मनात साठवलेले आहेत. त्या वासात बहुदा मला जवळ नसलेल्या माणसांचा ओलावा जाणवतो की काय ठाऊक.  सुगंधाने त्या मातीत, त्या माणसात हरवून जाते.  तेव्हाचा आजूबाजूचा परिसर, ते ऋतु डोळ्यासमोर येतात जसेच्या तसे.  कुंदी तशी वर्षभर यायची. उन्हाळा आला की मोगरा,जुई, पावसाळा आला की जाई, मदनबाण, सोनटक्का.
 सोनटक्का मी माळत नसे पण अतिशय सुवासिक फुल. लांब देठाच, पातळ पण लुसलुशीत पाकळ्या असलेलं. एखाद्या उंच देखण्या  नाजूक ललने सारखं भासतं. डोक्यात घातलं तर खूप पटकन मान टाकतं. शरीराची उष्णता सहन होत नाही त्याला फार. सांडपाण्यावर वाढणारं हे झाड. निसर्गाची कमाल आहे खरी, power to create fragrance from filth.

आपलंही असं व्हायला हवं ना. समोरच्याने चिखल फेक केली की आपणपण करणार असं न करता,  तू फेक काय तो चिखल माझ्याकडे , माझ्यातून जे उमटेल ते नेहमी उदात्त आणि उन्नत च असेल. आयुष्य काय आव्हानं द्यायची ते देईल पण आपण त्यांचं काय करतो ते महत्वाचं. Filth or fragrance?

अदिती हिरणवार

Thursday, June 4, 2020

कौशिकी : लोभस दृक श्राव्य अनुभूती


७-८ वर्षांपूर्वींच्या आमच्या भारतवारीतील एक गेट टुगेदरला एक मित्र बराच उशिरा आला, विचारल्यावर मिळालेल्या उत्तराने बाकी काही विचारणा किंवा उशिरा आल्यामुळे रुसण  शक्यच नव्हतं.  तो म्हणे, "काय सांगू ....मी एका शास्त्रीय संगीत सभेत द्रुकश्राव्य अनुभवात नाहून निघालोय ", असा इतका सुरेल आणि देखणा कार्यक्रम कुणाचा असेल असा प्रश्न पडलाय का?  तर तो होता अभिजात संगीतातील तेव्हा उभरत्या असलेल्या पण आताच्या नामांकित गायिकेचा ... कौशिकी चक्रवर्ती. या नावाने तो प्रसन्न चेहरा, ते विलोभनीय हास्य आणि स्वर्गीय सूर न आठवलेला विरळाच.

गेले बरेच महिने या नावाने आणि तिच्या आवाजाने गारुड केलंय माझ्यावर. उठता बसता तिचं गाणं ऐकते. आरस्पानी, अस्मानी सौंदर्य , गोड गळा , तो अतिशय सुरेल आणि गायनासाठी लवचिक, सशक्त करण्यासाठी घेतलेले अमाप कष्ट. सरगम वरची अफलातून पकड, कधी नाजूक हळवी तर कधी सूर झंकार करत तीन सप्तकात लीलया विहार करणारी तान . 
आवाजाची तुफान रेंज, पण चेहऱ्यावर किती साधे भाव. सुंदर आहोत हे माहित असून त्याचा बारीकसाही अभिनिवेश वावरण्यात नसणे याने तिचं ते सौंदर्य कमालीचं खुलतं. कोणताही कलाकार त्याचा कलाविष्कार साकारताना असलेल्या तल्लीन स्थितीत अतिशय मनस्वी भासतो. कला सादर करताना कलाकाराची आभा हा माझा एक वेगळा जिव्हाळ्याचा विषय आहे .रोजच्या जीवनात अतिशय सामान्य भासणारी व्यक्ती कलाविष्कार सादर करताना ओजस्वी भासते.. पण कौशिकी बद्दल माझा असा समज आहे की ती रोजच्या जीवनातही तितकीच असामान्य भासत असावी जितकी गाताना..निसर्गदत्त सौंदर्याचं लेणं अतिशय सहजतेने पेलणारी ही स्वरमोहिनी, जिथे सौंदर्य, कला, बुद्धिमत्ता, विनय, कर्तृत्व, अथक परिश्रम सगळंच एकत्र सुखात नांदतंय.  तिची कला आणि तिच्याशी अशक्य प्रामाणिक असलेली कौशिकी, हेवा वाटण्याएवढी भावते मनाला. 

लहानपानापासून घेतलेली मेहनत, तासनतास केलेल्या रियाजातून आत्मसात केलेले स्वर आणि पलटे , त्यावरची तिची पकड अफलातून. "याद पिया कि आये " गाताना  कधीतरी गमतीने कोयलिया कुहू कुहू म्हणताना खरंच कुहू कुहू  असा आवाज काढला तर आता श्रोते ती बंदिश आणि ती जागा घेतली नाही तर बैठक अपुरी मानतात . त्यावर ती थोडी  नाराजीही व्यक्त करते. एकाच गोष्टीने ओळखल जाऊ नये, हा तर माझ्या खजान्यातला एक छोटासा स्वर नजराणा आहे असं जणू काही तिला सांगायचंय . 

मी सतत रियाझ करते पण खास अशी मैफिलीची तयारी करत नाही असं ती सांगते . जे उमटतंय ते उमटू देत. गाणं मी गात नाही तर ते माझ्या आतून येतं .जसं वाद्यांच्या माध्यमातून उमटलेल्या  स्वरांनी  संगीत आपल्या पर्यंत पोचतं  तसंच  ते तिच्या  स्वरयंत्राच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोचतं असं  तिच म्हणणं आहे. किती ते जमिनीवर असणं! मैफिलीसाठी मंचावर बसल्यावर सर्व तयारी झाल्यावर अगदी गाणं सुरु व्हायच्या आधी एक क्षण येतो तेव्हापासून ते गाणं  संपेपर्यंत  जे काही असतं  त्यात कौशिकी नसते तर आधी केलेल्या गाण्याच्या तयारीतून आणि गळ्यातून घडणारी दैवी  किमया असते असं  ती मानते. 

you tube  वर गायनाचे खूप व्हिडिओज  आहेत तिचे.  एका गायन सभे मध्ये भैरवी रागातील विलंबित खयाल गायला आहे तिने. भैरवीने सांगीतिक बैठकांची सांगता होते त्यामुळे या रागात ख्याल  सहसा गायला जात नाही  बरीच दुर्मिळ गोष्ट तशी पण कौशिकीचे  गुरु, वडील आणि  तिचे आदर्श , पंडित अजय चक्रवर्ती यांनी हा गायला आहे असं  ती सांगते.  भैरवीतला ख्याल गायचा पहिलाच प्रसंग आहे त्यामुळे चूक असेल ती माझी पण काही भावलच तर त्याचं  श्रेय माझ्या बाबांना अशी सुरुवात करते ती. केवळ विनय म्हणून ती असे म्हणते आहे असं वाटण्या एवढा तो लाजवाब वाठवाला आहे तिने हा पहिला प्रयत्न.
 तसा भैरवी हा गान सभेच्या शेवटी गायला जाणारा हा धीर गंभीर राग. माझा लहानपणा पासून अतिशय आवडता. अगदी लहान असताना आई बरोबर कुठे तरी मैफिलीला गेल्यावर खूप वेगळ्या कारणांसाठी आवडायचा . कळलं होतं कि भैरवी म्हणली कि मैफिल संपते आणि बाहेर येता येतं . त्यामुळे  तो ओळखता  येऊ लागण्या आधीच्या काळात कोणीही काहीही गाऊ लागलं की ही भैरवी असेल तर बरं होईल😁 असं हमखास मनात येई. मोठेपणी तोच राग अतिशय हुरहूर लावतो..त्यातील बंदिश, भजन यातले बोल आणि रागातले स्वर तसेही कातर करणारे असतात म्हणून असेल कदाचित.

पंडित अजय चक्रवर्ती यांच्या श्रुती नंदन या संगीत शाळेविषयी मला वाटणारा आदर, जिव्हाळा कौशिकी मुळे दुगणा होतो. अजयजीनी जी मेहनत मुलीकडून करवून घेतली तशीच ते इतर मुला मुलींकडून करवून घेतात. सतत,अविरत कला शिक्षण देणारी अशी संस्था असणं आणि त्यातून कौशिकी सारखे कलाकार आपल्याला मिळणं हे भाग्यच आपलं.

कौशिकीच गाणं अजुन लाईव्ह नाही ऐकता आलंय ही खंत आहे. पण खूप खूप व्हिडिओज आहेत इंटरनेट वर. त्यातला मी कितीही वेळा पाहू शकेन असा व्हिडिओ म्हणजे तिची शंकर महादेवन यांनी घेतलेली मुलाखत. किती ताकदीची माणसं हो दोन्ही. या कार्यक्रमाने तर मी तिची सतत हलणारा पंखा झालेय. नक्की नक्की सर्वांनी पहावा असा आहे हा कार्यक्रम. 
त्यातच ती सखी या तिच्या ६ स्री  कलाकारांनी  एकत्र येऊन उभारलेल्या बँड  विषयी बोलते. त्यातील कंजली नावाचा गान प्रकार गाऊन दाखवला आहे तिने. ती ठुमरी आहे जी तिने अर्पण केली आहे पूर्वी तवायफ असायच्या त्यांना. कारण ठुमरी ही त्यांची देन आहे. आणि त्यांच्या व्यवसायाच्या पार्श्वभूमी मुळे त्यांच्यातील कलाकार आणि स्त्रीत्व नेहमीच उपेक्षित राहिलं आहे. त्या सख्यांना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या  band  मधे ही कंजली आवर्जून गायली जाते. किती विचार आहे ना यात सुधा? ज्याचा मान त्याला दिला गेला पाहिजे..

अजुन एक नक्की ऐका, भैरवी तील भजन ही म्हणते ती एक" तुम आ जाना भगवान"... त्याला एका मैफिलीत सरोद ची साथ आहे... जन्नत अनुभव आहे.

आपण जसे आता अनेक दिग्गज कलाकार ऐकतो , आपली वडील धारी म्हणतात की अरे हे आमच्या वेळचे... तेव्हा वाटायचं अरे आपण आधी का नाही आलो जन्माला , कुमारजी, वसंतराव वगैर लाईव्ह ऐकायला मिळाले असते. 
आता वाटतं तेव्हा नसू पण कौशिकीची कारकीर्द चालू असताना आपण कानसेन आहोत हे काय कमी आहे. पुढच्या पिढीला आधी जन्माला यायला हवे होतो असा विचार नक्कीच येईल  नंतर कौशिकी ला गाताना ऐकुन, पाहून.

हो त्या आधी मात्र मला लवकरच त्या लाईव्ह दृक श्राव्य अनुभवात बुडून जायचं आहे... किमान एकदा तरी🙏

अदिती हिरणवार

Tuesday, May 19, 2020

राघवशेला



कोरोना मुळे जगभरात पसरलेल्या एक भीतीच्या सावटाखाली आपण सारे सध्या जगतो आहोत. जोपर्यंत त्यासाठीची  प्रतिबंधात्मक लस, किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास हमखास लागू पडणारे औषध सापडत नाही तोपर्यंत तरी हे संकट असेच जगाला जायबंदी करत राहील असं एकुणात दिसतंय. ही परिस्थिती बदलण्यासाठी कोणत्याच देशाकडे सामाजिक अंतर  पाळण्या व्यतिरिक्त काही ठोस उपाय दिसत नाहीयेत. सगळी सरकार स्वतच्या परीने यावर तोडगे काढायचा प्रयत्न करताहेत. त्यांची त्रेधतिरपीट उडते आहे हे नक्कीच. एरवी प्रेरणादायी, उदबोधक ठरणारी बऱ्याच राजकारण्यांची भाषणं प्रभावी होत नाहीयेत. भविष्याच्या चिंतेने किंवा सद्य परिस्थितीत असलेल्या आव्हानामुळे  आपण थोडे का होईना भयभीत होतोच आहोत. पुढे काय, कसं आणि कधी हे प्रश्न सध्या कोणालाच उमगत नाहीयेत. आणि हे प्रश्न n पडायला आपण लहान पण नाही राहिलो आता.

लहान असतो ना तेव्हा वाटत असतं काही झालं तरी आई बाबा आहेत तोपर्यंत आपण सुरक्षित. आई बाबा सुद्धा परिस्थिती पुढे हतबल होऊ शकतात याची सुतराम कल्पना नसते. बाबांनी दिलेला शब्दिक आधार, कधी आईने स्वतः पुढे होऊन सोडवलेले त्यावेळी बिकट वाटणारे प्रश्न याने वाटत असतं की आई बाबा सगळं बघून घेतील. माझ्या आवाक्याबाहेरचे सगळे प्रश्न सोडवायला हे दोघे आहेत ना मग कसली काळजी ..तत्पर्याने तुमचा राघवशेला तुमच्या बरोबर असतो तोही सगुण रुपात.  ग्रेस म्हणतात ना "सीतेच्या वन वासातील जणू अंगी राघव शेला" अगदी तसा.

हळूहळू मोठे होतो, परिस्थिती, प्रसंग बदलतात. एखादा प्रसंग असा येतो की वडीलधाऱ्या मंडळींना पण परिस्थिती समोर हतबल झालेले बघतो आपण...
 बाबांच्या चार वर्षांच्या प्रदीर्घ आजारपणात कित्येक वेळा मी तो क्षण अनुभवला. तीव्र वेदनेने व्याकुळ त्यांचा चेहरा,  हा आजार कमी न होता वेगवेगळी भयानक वळणं घेणार आणि अखेर त्यांच्या सोबतच संपणार हे  त्यांनी स्वतः सांगितल्यावर पायाखालची जमीन सरकली होती... पुढचा प्रत्येक दिवस अनेक हतबल प्रसंग अनुभवत गेला. भय इथले संपत नाही हे मनोमन पटलं तेव्हा. एका सगुण शक्तीचा (बाबा) आधार घेत पुढे बिनधास्त चालणारी मी अशक्य डळमळले.  कोणताही माणूस परिस्थिती पुढे अगतिक होऊ शकतो या अनुभवाने आतून बाहेरून हादरले होते. निर्गुणाची ओळख अजुन व्हायची होती. त्या निराकार शक्तीवर अजुन विश्वास नव्हता. मग एखाद्या  भयावह प्रसंगातून जाताना आंतरिक ताकद देणारा तो राघवशेला कुठे होता साथीला.

हळूहळू बाबांच्या आठवणी ताकद बनू लागल्या. जगरहाटी चालू ठेवणाऱ्या त्या अज्ञात शक्तीवर विश्वास बसू लागला, त्यानंतर जी वेळोवेळी माझा राघवशेला बनते. ती अज्ञात शक्ती आपल्या समोर असलेलं आव्हान बदलत नसते तर आपल्याला त्याला सामोरं जाण्यासाठी सशक्त, समर्थ बनवत असते. आव्हानं साखळीने येत राहिली त्यामुळे याचा प्रत्यय अनेकदा आला.

हे सर्व पुन्हा प्रकर्षाने जाणवलं कोरोना मुळे. अवघं जग हतब ल आहे सध्या. हे केलं तर असं होईल का, मुलाची शाळा तर सुरू होते पण पाठवून काही चूक करत नाही ना आपण, एक ना दोन... ढीगभर शंका कुशंका...अशा भीतीच्या परिस्थितीतून चिकाटीने पुढे जाताना  आपल्या मनातला एखादा राघवशेला हा दुर्गम प्रवास थोडा सुगम करेल असं वाटतं.  राघवशेला जो प्रत्येकाचा वेगळा असेल. अगदी काहीही असू शकेल. पण सर्वात महत्वाचं आपण निष्ठेने त्याच्या साथीने मार्गक्रमण करत राहणं. सीतेने राघवाच्या शेल्याच्या  ( खरंतर हनुमानाने दिलेल्या अंगठीच्या) आधाराने रावणाच्या कैदेतील दिवस कंठले.  आपण आपल्या मनातील राघवशेल्याच्या आधाराने lockdown आणि त्यानंतरचा काळ व्यतीत करू शकू ना?

अदिती हिरणवार

Saturday, May 2, 2020

जीवनगाणे आनंदाने गाणारी आजी


( यमू आजी , आईची मावशी)

कित्येक वर्ष मला माहीतच नव्हतं की यमु आजी माझी खरी खरी आजी नाहीये म्हणजे आईची आई नाहीये. अजूनही आठवतं, खूप वाईट वाटलं होतं मला की का ही माझी सख्खी आजी नाहीये. सुट्टीला, लाड करून घ्यायला तर इथेच येतो , आई पण यालाच माहेर म्हणते मग अजुन काय असतं सख्खी आजी म्हणजे. आईची आई असायला लागतं हे लक्षात आलं नव्हतं. कारण आजी ने कधी हे जाणवू दिलं नव्हतं.
जसा सौरभ तसेच आम्ही दोघे असायचो सुट्टीला गेलो की. खूप दंगा करायचो म्हणून एकत्र शिक्षा असायची. आम्हाला शिक्षा केल्यावर ती कोणाला तरी का केलीय हे सांगतान आजीला गालातल्या गालात बारीक हसू फुटायच.
ते हसू अजुन लक्ख आठवतं. नानांनी आजीशी प्रेमविवाह केला तो या लाजवाब हास्यामुळेच असेल😍

थोडी मोठी होऊ लागले तशी आजी कळायला लागली. आईकडून तिची आधीचा जीवनपट कळाला होता आता स्वतः अनुभव घेत होते. बाबा आजीकडे कधीही जाऊन पोचले तरी हसतमुख स्वागत आणि मस्त तुपातला खमंग शिरा हे होणारच. दुखरी कंबर घेऊन , ओट्याचा आधार घेऊन उभी राहायची पण करू नको म्हणलं तर म्हणायची मोहनराव तुम्ही थोडीच रोज येताय... काही नाही होत एवढ्याश्या ने. किती लहान कृती होती पण मनावर कोरली गेली. संस्कार असेच घडत असतील बहुदा...
मी दहावीला असताना शकुमावशी आजारी पडली. पूर्णतः जागेवर होती ती. नानांच्या मदतीने आजी तिचे  सगळं जागेवर पण शिस्तीत करत असे. सहा बाळंतपणाने हल्लख झालेली कंबर घेऊन त्या वयात जागेवर असणाऱ्या मोठ्या मुलीची शुश्रुषा करणं सोपं नव्हतं. तिने तेही निकराने केलं. खूप आधीपासून अवगत होती तिला ही कला. स्वतःला त्रास होतोय तरी दुसऱ्या साठी करायचं कारण आपण नाही केलं तर तिला दुसरं कोण आहे. माझ्या आईची दोन्ही बाळंतपणं तिने अशीच केली. आईला दुसरं माहेरच नाही आणि तिची डॉक्टर सांगलीत. अण्णा आजोबांनी एकदाच आजीला म्हणलं की तिला येऊ देत तिला दुसरं कोण आहे..  असं म्हणाल्यावर आजीने आईला दोन्ही वेळेला सांगलीत घरी आणून तिची बाळंतपणं निगुतीने केली. दुसऱ्या वेळेला तर माझे आजी आजोबा ( बाबांचे आई बाबा)जे अतिशय म्हातारे होते आणि त्यांचं  माझ्या आईशिवाय कोण करणार म्हणून तेही म्हणे आजीच्या घरात एका खोलीत राहायला आले होते. हा तर कळस होता अण्णा आजोबा, नाना आणि आजीच्या चांगुलपणाचा. स्वतः पुरतं न बघता समोरच्याची अडचण समजून त्याला आधार देण्याची असामान्य कुवत. आणि हो ही कुवत मनाची लागते बाकी सर्व गोष्टी आपसूक मार्गी लागतात.

कुटुंबातील सर्वांचे हवे नको बघताना मनाला ताजं टवटवीत ठेवतो तो आपला आवडता असा एखादा विरंगुळा. विरंगुळा म्हणून चालू केलेलं कीर्तन आजीला किती बक्षीसं, सन्मान घेऊन आलं. जे करेल त्यात भराभर पुढे जाणं हे तिचं खास वैशिष्ट्य. थोडे थोडके अडथळे तर ती कधीच पर करून जात असे. भीड भाड ना बाळगता चार लोकांशी बोलून, अडचण सांगून त्यावर उपाय मिळवत राहायचं. रडत कुढत बसणे वगैरे तर माहीतच नसेल बहुदा. तिच्या वृद्धावस्थेत तिला वरच्या मजल्यावर काही दिवस राहावं लागलं. आधी थोडी वैतागली की आता कीर्तन बंद, गुडघे दुखतात तर खाली जाणार कसं म्हणून. पण पुन्हा भेटली तेव्हा जिन्यातच होती, मला वाटलं वर जातेय कारण तशी उभी होती पण नाही , उलट उतरलं की गुडघे दुखत नाहीत म्हणून उलटी उतरत होती कारण भजन कीर्तनाला जायचं होतं. असे हे उपाय शोधणे आणि आनंद मिळवणं.

दादा आणि मी पुण्यात दोघेच राहत होतो तिथे नाना आणि आजी आवर्जून राहायला आले होते. खूप मस्त वाटलं आम्हाला. मी स्वयंपाक करून वाढायची ते आवडीने खायचे. मी बाहेर गेलेली असताना दुधाच्या ऐवजी आजीने ताक घातलं चहात. नाना म्हणाले की अग चहा वेगळा लागतोय तू काय घातलं... तर म्हणे इथे जे काय होतं ते घातलं, जाऊ देत आता प्या आहे तसा. ... मी आल्यावर काय धमाल हसलो सगळे मिळून.त्यांच्या तरुणपणी तरकट असणारे नाना आता किती हसून सांगत होते हे सगळं. आजी नाना , भिन्न स्वभाव पण काय लोणचं मुरल होतं.किती सांभाळून राहत एकमेकांना . भांडणं वादावादी चालायची पण मधेच काहीतरी विनोद करून दोघेही हसायचे. आजीला आलेलं हसू ही एक अनुभवायची गोष्ट होती.. एका सुरात म्हणलेल त्यांचं करुणाष्टक कानात आहे अजुन, प्रसंगी हळवं करतं मला. त्यांचा आधार आत्ता असता तर असं वाटून.

बाबा गेल्याचं कळल्यावर आजी नाना राहायला आले होते. आईच्या बाजूला तेव्हाही आजी उभी होती. थकली होती शरीराने तशी. बसून बसून सर्वांना काय करायचे काय नाही याचं मार्गदर्शन करत असे.  तेव्हा मी तिला ओट्यापाशी खुर्ची देऊन, बाकी सगळी तयारी करून, डाळ वांगं करायला लावलं होतं. अफलातून चव.  साधे पदार्थ वापरून अशी चव कशी आणायची तिची तीच जाणे.
आईची एकसष्ठी केली तेव्हा तिला निरोगी दीर्घायुष्य चिंतण्याप्रीत्यर्थ सत्यनारायण केला होता. आईच्या पोरक्या आयुष्यात मायेची पखरण करणारी आजी म्हणून सत्यनारायण आजी नानांच्या हस्ते पुजला. आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायला समस्त मावस मंडळी उपस्थित होती त्यामुळे आईही मनापासून आनंदली.
आजी शेवटची काही वर्ष जागेवर होती पण असली भन्नाट तेजस्वी दिसायची.  नाना, शाम मामा, सृजा मामी, मुलं यांनी खूप मनापासून सगळं केलं तीचं. आईला "कुसुमे तुझी एखादी सुती साडी आण गं, मला पांघरायला आवडते " म्हणायची.  आजी, आई, मावशीने वापरलेल्या सुती साडीत ऊब असतेच, तीच आजीला आईच्या साडीत मिळायची बहुदा. तिची खरी नव्हे पण तशी म्हणलं तर मोठी लेकच माझी आई. आजीचे बरेचसे गुण आईत तंतोतंत उतरले होते. प्रसन्नता, उरक, उत्साह , पाककला, आहे त्याच्यात समाधानी तर राहायचं पण पुढे काहीतरी करत राहण्याची धडपड, सगळं तसं. या दोघी मावशी भाचीला काहीसं अनवट चालीचं जीवन गाणं आलं पण काय सुरेल गायलं त्यांनी🙏

Saturday, April 4, 2020

सूर सखा



ऑगस्ट 2018. आई UK madhe होती माझ्याकडे. आजारी होती, हॉस्पिटल ला तपासण्या चालू होत्या. 80% कळलं होतं की रक्ताचा कर्करोग आहे. अशावेळी हॉस्पिटल मधे जाता येता होणारे गाडीतले प्रवास anxiety वाढवणारे असायचे.पण हे  प्रवास सुसह्य केले राहुलच्या गाण्याने.  त्याच काळात Rahul Deshpande tyacha audio blog karayacha. Mi कायमच सगळे भाग ऐकायची पण विशेषतः तेव्हा आलेला गुरुजी भाग 3 ने मला वेड लावलं होतं. त्यातला सुरवातीलाच गायलेला रागेश्री मधला तराणा .. अहाहा काय तो आवाज, भेदक सूर, सुरेल ताना आणि त्यातून तो तराना त्यामुळे अधिकच आवडला. राही रागाची सुरावट सुधा अप्रतिम. तर मी प्रत्येक वेळी जाता येता हा ब्लॉग गाडीत लावायची. हॉस्पिटलला जाऊन काय ऐकायला मिळणारे, किती वेळा आईला सुया खुपसून घ्यायला लागणारेत, येताना आलेली भकासता, उद्विग्नता, खिन्नता सगळी मी आणि आईने या गाण्याच्या जीवावर पेलली. हेच लावून कधी गाडीत ढसढसा रडलो तर कधी धीराने सामोरे गेलो. संगीताची ताकद. त्यातून कलाकार  इतका तयारीचा असल्यावर काय हवं. राहुल, माझ्या आयुष्यातल्या अशा अनेक आव्हानांना सामोरं जाताना तुझं गाणं बरोबर असतं आणि ते हा प्रवास कधी सुसह्य, सुखकर, अविस्मरणीय तर कधी आनंददायी करतं.  जसा माझा नवरा, माझे नातेवाईक,मित्रमैत्रिणी माझ्या बरोबर माझ्या प्रसंगात असतात तसाच आधार आणि सहभाग तुझ्या गाण्याचा असतो तुझ्या आत भिडणाऱ्या आवाजाचा असतो. तुझ्या या योगदानासाठी मनापासून धन्यवाद आणि त्यासाठीच हा लेखप्रपंच.

साधारण 2000-2001 सालची गोष्ट असेल. झी मराठी वर सूर ताल नावाचा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम लागायचा. बाबा आजारी असायचे पण रोज सकाळी आणि संध्याकाळी न चुकता दोन्ही वेळचा कार्यक्रम पाहायचे. बऱ्याचदा संध्याकाळचा रिपीट telecast असे. आजचे प्रस्थापित मराठी गायक गायिका तेव्हाचे उभरते कलाकार होते आणि त्यांच्यासाठी हा एक चांगला मंच होता. एक दिवस सकाळी कॉलेजला जाण्यासाठी आवरता आवरता एक  किंचित अनुनासिक पण थेट काळजाला भिडणारा आवाज ऐकू आला...एक मुलगा वसंतरावांचे गाणं गात होता. पळत येऊन पाहिलं तर बाबा म्हणाले हा राहुल देशपांडे, वसंतरावांचा नातू. अजुन विशी सुधा पूर्ण न केलेला हा उमदा युवक.
त्याचं गाणं, त्याचा आवाज, हातवारे, गाताना मधेच नाजूक हसणं सगळच फार भावलं. त्याचं गाणं सूर ताल मधे लागताच असेन तिथून धावत येऊन ऐकू आणि पाहू लागले.

सवाई गंधर्व पाहायला गेलं की मी तबलजी आणि त्यांच्या "अदा"   यावर किती जीव टाकायचे घरातल्या सर्वांना माहीत होतं. पण आता एखाद्या गायकासाठी, त्याचं गाणं ऐकायला आणि तो तल्लीन होऊन गाताना ते पाहायला मी तशीच वेडी होत होते. आई बाबा वसंतरावांच्या गाण्याचे निस्सीम चाहते त्यामुळे त्यांची गाणी लहानपणापासून कानावर पडलेली , ती आता राहुल गात होता. जाम आवडत होता आम्हा सर्वानाच. माझ्यासाठी सचिन तेंडुलकर ला सॉलिड competition  आली होती. सचिन ची मॅच आणि राहुलचं गाणं मी चुकवत नव्हते.

बाबानाही राहुलचं गाणं भारी आवडायचं.  म्हणायचे राहुल ने आजोबांची गाणी जरूर गावीत पण त्यात अडकून पडता नये. गळा अजुन तयार करून सुसाट सुटला पाहिजे. आजोबांची  गाणी स्वतःच्या शैलीत गायला हवी त्याने. अर्थातच राहुल पण तयारी करत होता. त्याला पुलं सारखे आजोबा, बापू काका सारखे कानसेन वडील, तज्ञ आई आणि एकाहून एक तरबेज गुरू होतेच की. प्रत्येक पुढचा कार्यक्रम पहिल्यापेक्षा सरस होत होता. आजोबांच्या शैलीचा हात धरून वर आलेला राहुल  हळूहळू स्वतःची शैली, ठसा उमटवत होता.  माझंही वेड वाढतच होतं. मी ही गाणं शिकत होते माझ्या आईकडे. बगळ्यांची माळ फुले तेव्हा डोक्यावर सवार होतं. ते गायचा पुरेपूर प्रयत्न चालू होता माझा. गळ्यातून उमटत नसली तरी त्या गीताची प्रत्येक जागा, प्रत्येक सूर कानात होता. इतक्या वेळा ते गाणं म्हणायचे मी, आई पेटीला आणि मिलिंद तबला घ्यायचा वाजवायला, माझी वहिनी मंजु,  ईशान chya वेळेला प्रेग्नंट होती तेव्हा. ती म्हणू लागली माझं बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा रडण्या ऐवजी नक्की बगळ्यांची माळ फुले म्हणणार😁 सांगायचं असं की एवढं राहुलच्या आवाजाने त्याच्या गाण्याने माझ्यावर गारूड केलं होतं.

पुढे मी UK ला आले आणि संगीताच्या लाईव्ह कार्यक्रमांना पारखी झाले. पुण्यातली ही हिरवळ मात्र जगात कुठे सापडेल असं वाटत नाही. आठवड्याला एखादा संगीताचा कार्यक्रम पाहणारी/ ऐकणारी मी आता वर्षभरात एखादा पाहू लागले.तेव्हाच राहुलची काही गाणी ऑनलाईन सापडली. पण ऑडियो.अजुन YouTube yet hota. त्यात मारूबिहाग मधली चीज होती, " मै पतिया लिख भेजू". अहाहा काय सुरेख म्हणाली होती राहुल ने. याड लावलं मला तिने. दादाला पण ऐकवली, पाठवली तो पण येडा मग त्याचा😃

एक दोन वर्षात भारतवारी मधे कट्यार पहायची संधी मिळाली. जाम आवडला नाटक.एकदा बघुन समाधान होईना पण नाही मिळालं पुनः पाहायला. राहुल च गाणं तर आवडतं पण अभिनय जमेल का.. असं वाटणाऱ्या सर्वांना त्याचं काम नाटक गाणं सर्व काही आवडलं.  राहुलचं प्रयोगशील असणं जबरी भावलं मला. खरं पहायला गेलं तर ती जोखीम होती त्याच्या गाण्याच्या करियर वरती घेतलेली पण ती त्याने उचलली आणि यशस्वीरीत्या पार पाडली. चुका होणं साहजिक पण त्या सुधारण्यासाठी परिश्रम घेत राहणं हे त्या पुन्हा न होण्यासाठी प्रचंड महत्वाचं. राहुल ने नेमकं हे पकडलं. चुका होण्याच्या, अपयशाच्या भीतीने प्रयोगशीलता नाही मारली. एखाद्या उभरत्या कलाकारासाठी धाडसी पायरी असणारे ती.  कसोटी लागली असेल पण अशाच वेळेला स्वतच्या कौशल्यावर आणि मेहनतीवर पाय रोवून उभा राहू शकला तो राहुल.

 आज त्याचा गळा, त्याचा सूर वयाप्रमाणे प्रगल्भ होतोय हे स्पष्ट जाणवत. सतत काहीतरी नवीन सुचत , दिसतं ते प्रयोग करत असतो , काहीवेळा डोक्यात सुचलेल्या विचाराला गळा साथ देत नाही असं प्रांजळपणे कबुल करतो. पण दुसऱ्या क्षणी विजेसारखा कडाडतो. कधी नाजूक लयदार तान तर कधी बरसणारा मेघ.आत खोलवर पोचणारा सूर. जीवघेणी सुरावट आणि त्यात प्रसन्न मुद्रा घेऊन गाणारा राहुल.   नरसोबाची वाडी ला जेवणारे भटजी जसे मांडी घालून दोन्ही पायांच्या पुढे मधोमध डावा हात पालथा ठेवून उजव्या हाताने श्रीखंड चोपतात, तशी एक लकब आहे राहुलची. तसाच बसून दोन्ही हात पुढे पालथे घालून खांदे उचलून ठेवणीतल्या पल्लेदार ताना घेत असतो.  गाण्यातील एखादी नाजूक जागा घेताना उजवा  डोळा बारीक मीचकावतो, हातांची दोन बोटं पुढे नेत त्या लकेरीतील नजाकत उलगडून दाखवतो आहे असं वाटतं. ओयेहोये क्या बात है.. दिलं खुश हो गया तर अलिकडच कैवल्यागान ऐकुन कातर होतं मन. कुमार गंधर्व यांची अजरामर केलेली निर्गुणी भजनं, गझल, भजन, नाट्यसंगीत, अभंग, भावगीत असे सुगम संगीताचे अनेक प्रकार तो आवडीने ताकदीने गातो. जुन्या संगीत नाटकांना पुन्हा रंगमंचावर आणून तरुण पिढीला आपल्या संगीताची झलक दिली.   वसंतोत्सव सारखा गाण्याचा उत्सव सुरू केला.सर्वांना विनामूल्य प्रवेशिका असतात.  मला ही गोष्ट फार आवडली. त्याला कारण असं की शास्त्रीय/अभिजात  संगीत हे पैसेवाल्या लोकांनाच उपलब्ध आहे असं नाही तर संगीताचा खरा चाहता ते ऐकू शकला पाहिजे. भारतीय संगीताचा प्रसार करण्यामध्ये याचा वाटा नक्कीच मोठा ठरेल असं आपलं मला वाटतं. मी जेव्हा पुण्यात शिकत होते तेव्हा कितीही वाटलं तरी सवाई किंवा इतर मोठ्या कार्यक्रमाची तिकीट आम्हाला परावडायची नाहीत, कोणी आतून मानाचे फुकट पास मिळालेली लोकं बाहेर आली की आम्ही ते पास मागून आत जाऊन उरलेला कार्यक्रम पहायचो. जगजीत सिंग यांचा एक  गणेश कला क्रीडा मधला कार्यक्रम तर अख्खा बाहेर गाडीवर बसून ऐकला आम्ही सर्वांनी. आत जायला तेव्हाच ५०० रुपये तिकीट.  त्या धर्तीवर मला हा राहुलचा उपक्रम स्तुत्य वाटला. त्यातून गाण्याचे कार्यक्रम त्याने फक्त पुण्यापर्यंत मर्यादित न ठेवता नाशिक, सातारा, कोल्हापूर येथे वसंतोत्सव करून पोचवले.
साताऱ्याच्या वसंतोत्सवातील गाणी YouTube var tyachya channel var आहेत.
 अतिशय अप्रतिम आणि तयारीच गायला आहे त्यात राहुल. अमर ओकची बासरी, आदित्य ओक ची हार्मोनियम ची साथ सहज सुंदर. पण मोहक आहे ती सरोद वादनाची साथ. कलाकार मला माहितीचा नाहीये. राहुलच्या गाण्यात मधेच सरोदचे सूर गाण्याला अशक्य उंचीवर नेतात.  असं कौशिकीच्या एका मैफिलीत अनुभवलं होतं. राहुलची मैफिल तशी पाहून ही टॉप फॅन एकदम खुश.

सध्या फेसबुक लाईव्ह मुळे राहुल बऱ्याचदा दिसतो, त्याचं गाणं virtually live aiku शकतो हेही नसे थोडके.

राहुलला मिळालेली आवाजाची देणगी, त्यावर घेतलेली अपरिमित मेहनत, गाण्यातला, सुरातला आणि विचारातला सच्चेपणा त्याची कारकीर्द यशस्वी आणि झळाळती करेल यात शंका नाही. पण याच सर्व गोष्टी त्याला ऐहिक सुख, कीर्ती यांच्या पलिकडे जाऊन संगीतातून मिळणारा परमोच्च आनंद ही मिळवून देतील.
आमच्या सारख्या असंख्य लोकांना त्याच्या या कलेने आनंद, उमेद अशीच सतत मिळत राहो🙏

राहुलचा YouTube channel://www.youtube.com/channel/UCD-gpX6FMfs3M4mhLsz8Wkw

Listen to Audioblog 21 (Season 2) Guruji Part 3 by Rahul Deshpande on #SoundCloud

अदिती हिरणवार

जिएं तो जिएं कैसे बिन आपके

तुझ्याशिवाय मी नाही राहू  शकणार असं मला अतुल भेटल्यावर म्हणालेले बाबा, खरंच नाही राहिले आमच्या लग्नानंतर. खूप मनाची शक्ती लागली बाबा गेल्यावर त्यातून वर यायला. कित्येक रात्री मधेच जाग यायची आणि मग बराच वेळ रडत जायचा. त्यांचा सगळा त्रास आठवून खूप कासावीस व्हायचं. आईला त्रास होईल म्हणून काहीच नाही बोलायची तिला. आणि तीही मला. दादा दुबई मधे, त्यामुळे तो आणि मंजू पण वेगळेवेगळे. आता मागे पाहिल्यावर वाटतं किती खडतर होते ते दिवस आपल्या प्रत्येकासाठी.  मुन्ना राण्या, मोनू, काय आणि काय. घरात तुझी किलबिल नसेल तर ते घर कसं होईल म्हणायचे बाबा. तेव्हा तुम्हा तिघांशिवाय हे घर
असू शकेल याची कल्पनाही नव्हती केली मी.
खूप मेहनत घ्यावी लागते आहे स्वतःवर तुम्हा तिघांशिवाय जगताना...

सण तर प्रचंड घालमेल करतात मनाची.आपण सण किती उत्साहाने साजरे करायचो. प्रत्येक सणावर एक लेख होईल इतके भरगच्च असायचे सण. आणि हो दिमाखात असायचे पण पैशाच्या नाही तर माणसांच्या .  गणपती, नवरात्र दसरा नुसती धमाल. सगळे जण आपापल्या परीने कामाला लागायचे. कोजागिरी जवळ आली की हमखास हुरहूर लागते माझ्या मनाला. आपल्याकडे वाढदिवस साजरा करत नाहीत म्हणून कोजागिरीच्या निमित्ताने चमचमीत खायला काहीतरी आणि  मसाला दूध करून सगळे एकत्र बसून प्यायचो. नंतर काणेकरांच्या घरी संगीत रजनीला जायचो. तुम्ही सांगायचा की घरी झोपा तुम्हाला झोप येईल पण तो लाईव्ह संगीताचा आवाज ऐकायला तेव्हाही आवडायचा म्हणून यायचो, मग झोप यायची मग बाबा घरी आणून सोडायचे. पुढे पुण्यात मस्त मित्रमंडळ जमवून मिसळ किंवा पावभाजी , पुलाव मसाले दूध करून रात्रभर गाणी म्हणत जागवायचो. सकाळी उठून सगळे आपापल्या कामावर. इतक्या असंख्य कोजागिरी  डोळ्यासमोर येतात अशा. आणि अशा दिवशी आपला वाढदिवस इतक्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होतो या कल्पनेने कोजागिरी  पौर्णिमेला माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. अलीकडे काही वर्ष एक मित्र परिवार जमून गाणी म्हणत नसू तर ऐकत छान साजरी करतो कोजागिरी. नाहीतर भारताबाहेर आल्यापासून  या  सर्वाला पारखं झाल्यासारखं  वाटायच.  माझ्या मनातली कोजागिरी कशी सापडणार मला इथे. माझ्या शिवाय कोणाला माहीत पण नव्हतं की मी काय शोधतेय त्या दिवशी किंबहुना त्या रात्री.  सगळे जमलोय,निखळ दंगा चालू आहे,  चविष्ट खादाडी चालू आहे, कोणीतरी मधेच गाणं म्हणायला चालू करतय, कोण तबला काढताय, पराग गिटार ची अप्रतिम साथ देतोय, श्रुती, श्वेता नृत्य करताहेत... अहाहा... एकातून एक गाणं सुचून कधी पहाट होतेय कळत पण नाही. आता कुठे तासभर झोपणार चला सकाळची गाणी म्हणू असं करत अंघोळ करायच्या वेळेपर्यंत गाण्याचा यज्ञ चालायचा. या रात्रीची आठवण काढत अख्ख वर्ष जायचं आणि दसरा झाला की  मंडळी पुढची कोजागिरीच्या तयारीला लागायची. काही मंडळी गळायची, काही नवीन यायची पण कोजागिरी साजरी व्हायची. वयामुळे असेल पण तेव्हा जागरण म्हणजे अस्स करायचो. आता जमलं असतं का?  आता वाटतं मी पुण्यात असते आणि दादा असता तर केली असती  कोजागिरी तशीच साजरी... आम्ही दोघेही भावंडं असल्या मजेला नेहमीच एका पायावर तयार म्हणा. आतातर अनिल, सानु, ईशान हे नव्या दमाचे कलाकार पण आहेत.काय रंगली असती कोजागिरी...मुख्य माणूसच नाही ना पण...उत्साह मूर्ती माझी.

 दुसरी उत्साह मूर्ती तर केवळ अशक्य..... तीही अशीच अचानक निघून गेली या जगातून.. ऑफिसमधे तुफान काम असू देत  त्याच्यावर पण नंदन दादा थकला आहे आणि त्याला दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळ करायला यायला उशीर झालाय हे शक्य च नाही... पटापट पायऱ्या चढत, एखादं सुंदर गाणं म्हणत स्वारी घरात शिरणार. एक एक करत सगळे हजर vhyache, २०-२५ जण असायचो. गणपती मंदिरात सर्वांनी मिळून घेतलेलं दर्शन, घरी येऊन आईच्या हातचे खमंग फोडणीचे बांद्याचे लाल पोहे, गुळपोहे, दहीपोहे, आणि सर्वांचा फराळ असा थाट असायचा. पुष्पा ताईच्या चकल्या खात खात त्यावर काहीतरी विनोद चालू असायचे. आई आम्हा सर्वांना त्या दिवशी ओवाळायची ... खूप भारी वाटायचं मला ती ज्योत आपल्यासमोर ओवाळलेली पाहून. इतकं पोट भरायच की सगळे म्हणायचे आता काही जेवण वगेरे नको. काहीतरी थट्टा मस्करी सुरू असायची. एवढ्यात कुठेतरी जाऊया अशी टूम निघायची. १०-१२ दुचाक्या निघायच्या. भटकत भटकत शेवटी स्वारी भोज्याला पोचायची म्हणजे एखाद्या हॉटेलात. अवधूत काका आणि ज्योत्स्ना ताई बँकेच्या दिवाळी बोनस चा भाग आमच्या त्या वेळेच्या पार्टी वर खर्चायचे. तिथून भरपेट खाऊन तृप्त होऊन सगळे पुन्हा घरी यायचो. चक्क सगळे बाहेरच्या खोलीत जमेल तिथे आडवे व्हायचो... ज्येष्ठ मंडळी डुलकी काढीत पण आमची कुजबुज चालू असे. थोड्या वेळात चहा टाका घरी लक्ष्मीपूजन करायला जायचंय अशी मागणी करण्यात यायची. चहा पिऊन या अशक्य सुंदर मैफिलीची सांगता व्हायची.
आधी बांद्यात असताना तिथेही खूप धमाल केली दिवाळीला. खूप माणसं आणि त्यातून आम्ही सगळी मुलं एकत्र दंगा घालायचो नुसता. मला सांगा इतक्या माणसात दिवाळी साजरी करायची सवय असणाऱ्या मला इथे लंडन मधे माणसं जमा केल्याशिवाय कसं करमेल...पण विकांत नसेल तर कुठून येणार माणसं? .इथले सगळे सण शनिवार रविवारी साजरे होतात. इथेही जीवाभावाची मित्र मंडळी आहेत,  जमतो एकत्र खातो पितो. मजा असते...
.पण या मनातल्या दिवाळीचं काय?  प्रत्यक्षात नाही होत आता तशी साजरी  अशी तडजोड तर केलीय मनाशी... पण ही आठवणीतील दिवाळी कायम असते माझ्यासोबत,  तशीच्या तशी.

 आणि तुम्ही, सर्व सोडून गेलेली मंडळी...आता वर जोरात दिवाळी करत असाल ना... तिथेच उपस्थिती जास्त आहे आता या कंपुतली...
तुमच्या शिवाय जगताना होणारी आमची तारांबळ पाहून छान करमणूक होत असेल नाही? आम्हाला पडलाय तसा तुम्हालाही पडतोय का हा प्रश्न ? जिएं तो जिएं कैसे बिन आपके?

वसुधैव कुटुंबकम्

ही अवघी वसुधा हा परिवार असं मानणारी आपली संस्कृती. मग दिवाळी साजरी करायची ती फक्त भारतीय समाजा पुरती मर्यादित न ठेवता इथल्या स्थानिक लोकांना देखील यात सामील करायला हवं असा विचार मनात प्रबळ होत होता. आमचे भारतीय मित्र आणि त्यांच्या परिवारासोबत दिवाळी आणि इथल्या इंग्लिश लोकांबरोबर त्यांचे सण असं विभाजन न करता तन्मय ला  सर्वांना सामील करून घेणाऱ्या भारतीय संस्कृतीची ओळख आपल्या घरातूनच व्हावी हा उद्देश.

विचार पक्का झाला आणि  तन्मय च्या वर्गातल्या मुलांच्या आई मंडळींच्या WhatsApp group  var तारीख , वेळ कळवली आणि सर्व मुलांना व त्यांच्या भावंडांना घेऊन यायचे आमंत्रण दिले. प्रचंड उत्साहाने सगळ्या आया येतो असं कळवू लागल्या. त्यांनी ही कल्पना फारच अगत्याने स्वीकारली आणि काही मदत लागली तर सांग अशी प्रेमळ विनंतीही केली.
तन्मय च उत्साह आणि उत्कंठा शिगेला पोचली होती. मी लागेल ती मदत करीन पण आपण नक्की हा कार्यक्रम करूया असं सारखं सांगत होता मला. माझ्यासारखं त्यालाही सर्वांना घरी बोलवायला आवडतय हे पाहून मीही मनोमन सुखावले.

भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम करायचा ठरला. यावर्षी शाळेला हाफ टर्म ची सुट्टी दिवाळीच्या काळात  असल्याने हे जमून आलं. Preeti Rajesh , सुतेजा या सजावटीमध्ये आणि कार्यक्रम आखणी मधे तरबेज असलेल्या मैत्रीणीना फोन केले आणि प्लॅन सांगितला. त्यांनी दोघींनी खूप छान कल्पना सुचवल्या. सूतेजा तर त्यादिवशी येऊन मदत करेन म्हणाली. याने माझा उत्साह आणि आत्मविश्वास दोन्ही द्विगुणित झाले. सुतेजा आणि प्रणती यांनी खरंच वेळेआधी येऊन लागेल ती मदत केली.
श्रेया ने पेपर कापून दिले.
25 मुलं आणि 15 मोठी माणसं अशी आम्ही सगळी आमच्या घरी जमलो. मुलांना एकत्र बसवून थोडक्यात दिवाळीची माहिती, किल्ला केला होता त्याची माहिती दिली. टॉयलेट रोल पासून आकाशकंदील आणि प्ले दोव्ह च्या पणत्या बनवणे अशा दोन  activities ठेवल्या होत्या.  मुलांनी खूपच उत्साहाने आणि मन लावून  या दोन्ही activities केल्या.
बटाटेवडा, शंकरपाळी, बिन तिखटाचा चुरमुर्याचा चिवडा, शेवपुरी आणि त्या वर घरी बनवलेले आंबा आईसक्रीम असा बेत होता.
जमलेली सर्व मुलं खूप गुणी होती खरंच, खूप जास्त आवाज  यापलिकडे जाऊन कोणत्याही आक्षेपार्ह गोष्टी त्यांनी केल्या नाहीत त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय निर्विघ्नपणे पार पडला. स्वतः केलेले आकाशकंदील आणि पणत्या घेऊन मुलं खूप आनंदात घरी परतली.
सगळे गेल्यावर तन्मय ने गळ्यात पडून  मम्मा, thank you for inviting everyone,  I enjoyed every bit of it asa  sangat  सुरेख दाद दिली.  बस् अजुन काय पाहिजे? माझी दिवाळी साजरी व्हायला!

Celebrated Diwali with Tanmays friends. It was great fun to have everyone at home. Thank you so much guys for the enthusiasm. Kids and mums were simply amazing.