Sunday, September 17, 2017

जेहन में तुम हो

तुझ्या भावाला जाऊन किती वर्षं झाली? , काकूंच्या प्रश्नाने आठवणीत रमलेली मी धाडकन वास्तवात आले. म्हणलं साडेपाच वर्षं झाली. " अजून किती त्याच्याविषयी बोलतेस, किस्से सांगतेस जणू काही तो आहेच"  त्यांच्या या वाक्यानंतर गालावरून कधी अश्रू ओघळू लागले कळलं पण नाही. काकूंचा हेतू मला दुखावण्याचा अजिबातच नव्हता, उलट त्या म्हणाल्या की कौतुक वाटलं तुमच्या नात्याचं. 
वाटलं खरंच मी किती बोलते अजून दादूविषयी, किती आठवणी आणि काय काय, डोक्यात नसतंच बहुतेक बऱ्याचदा की आता तो नाहिये. किती ते भूतकाळात रमणं. आणि हे सगळं इतकं अंगवळणी पडलं होतं की काकूंनी बोलून दाखवेपर्यंत जाणवलंच नव्हतं.
पण करणार तरी काय? ' जेहन में' असणं हेच असेल का?
दादू,
लहानपणी कचा कचा भांडणारे आपण एकमेकांचा आधार बनत होतो हे जाणवत होतं. लहानपणी सुद्धा भांडत होतो तरी काळजी घ्यायचो हं.  तू बरोबर असलास तर मी पुण्यात सुट्टीला आत्याकडे राहू शकायची, अगदी एक रात्र सावंतवाडीला राहायचं झालं तरी आधी खात्री करायची की तू पण असणारेस बरोबर. तू सांगलीला शिकायला गेलास तर जाम रडू यायचं तुला सांगलीत सोडून येताना. 
पुण्यात मणिबंध मधला आपला भावाबहिणीचा संसार😀.  किती मज्जा केली ना. एकत्र शिकत होतो की जबाबदारी काय असते, पैसा कमवून त्यात महिना भागवणे काय असतं, त्यातून मित्र मैत्रिणी , भावंडं जमून किती धमाल येऊ शकते.  आई बाबांचे संस्कार पार आतपर्यंत पोचले होते त्यामुळे व्यसनं आणि कुसंगती याकडे वळलो नाही. खूप छान माणसं भेटली, काही नवीन नाती घडली तर काही असलेली दृढ झाली. अतुल भेटला की त्याला माझा दादू असा आणि तसा ह्याच गप्पा सांगायची. लिहिता लिहिता जाणवलं की तू असताना पण मी तुझ्याविषयी भरभरून बोलयायचीच की.  फरक एव्हढाच की तेव्हा तू होतास, तुला मी भेटू शकत होते,  नुसतं तुझ्याविषयी नाही तर तुझ्याशी पण बोलू शकत होते. 
आता मात्र "रात भर ख्वाब में देखा करेंगे तुम्हे, फिर वही रात" च्या प्रतीक्षेत असते.

आई बाबा तू मी. आपला चौकोन. अतूट वीण असलेल्या नात्यांचा. बाबांच्या आजारपणात कुठेतरी जाणीव झाली की आईबाबा आयुष्याच्या कोणत्यातरी टप्प्यावर हात सोडतील. बाबाचं जाणं पण तू आई आणि अतुल च्या जीवावर कसंतरी पचनी पाडलं. आई आणि अतुल बरोबर आहेत म्हणून अजूनही माझ्यातली मी आहे म्हणीन. लहानपणी सारखाच तू कायम बरोबर असशील अशा भ्रमात होते.  त्या भ्रमनिरासाचं दुःख बहुदा कायम असंच राहील ' जेहन' में'.