Thursday, February 14, 2013

भय इथले संपत नाही


दादू,

 खूप दिवस तुझ्याकडे व्यक्त व्हायचा प्रयत्न करत होते पण डोळे इतके भरून यायचे की लिहीताच नाही यायचं. आज बघू जमतंय का.

खरं तर आधी बाबा आणि आता तू गेल्यावर मला घरातलं, कुणी अगदी जिवाभावाचं माणूस गमावण्याची भीती राहू नये असा वाटतं. हा घाव पचवायची,त्यातून कसबसं  सावरत उभा राहायची ताकद देव दयेने मिळाली पण झालंय उलट. हातातून अजून काहीतरी असंच निसटून जाईल की काय अशी भीती सतत नाहीतरी कित्येक वेळा वाटते. क्षणभंगुरता नावाच्या भीतीने मनात  एक मोठ्ठं घर केलंय. 'जीवन हे क्षणभंगुर असतं ' हे वाक्य पूर्वी घरातल्या वडील धार्या मंडळींच्या तोंडून खुपदा कानी पडलेलं, वाटायचं काय न ही मोठी लोक कथा कादंबरीतली वाक्य बोलतात , पण आयुष्यात सतत साथ देणारं ते  एकमेव शाश्वत सत्य आहे हे आता जाणवतंय. हे कळायला फार मोठी किमत मोजली रे आम्ही सर्वांनी दादू.

 आत्ता थोड्या वेळापूर्वी खिदळणारा दादू अकस्मात निपचित कसा काय होऊ शकतो? कुठे गेलं ते चैतन्य ? नक्की काय झालं ? आता पुढे काय? मंजू , ईशान , आई  ...  हजारो प्रश्न..... कशाचीच उत्तर कोणाकडेच नव्हती ... सगळे म्हणायचे काळ हाच उपाय ... पण तो उपायाचा काळ घालवणं  किती अवघड आणि असह्य वेदना देणारा. रोज  एक वेगळी आठवण. तुझं प्रत्येक नातं इतकं घट्ट  की आम्ही सगळेच जण तितकेच जबर जखमी .कोणी कुणाला सावरायचा हा प्रश्न. बाबांनंतर कसंबसं सावरलेलं घर पुन्हा एकदा कोसळलं. इतका तीव्र आघात आहे मनावर की ती रात्र, तो दिवस जात नाही डोळ्या समोरून. आता घट्ट असणारं मन  कधी हळवं होतं कळत नाही. एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं  तर मग हा सगळा आटापिटा कसला? का उभं  राहायचं  आणि कशामागे धावायचं आम्ही पायात ताकद नसताना ? वेडे वाकडे विचार मनात थैमान घालत होते.पण आम्ही प्रत्येक जण एकमेकांना सावरत होतो त्यातून स्वतःच सावरले जात होतो. सावरणे हा शब्द याच संदर्भात बहुतेक वेळा वापरला जातो. फार खटकायचा हा शब्द तेव्हा. आता कळतंय की  तू आता कधीच दिसणार  नाहीस , आमच्याशी बोलणार नाहीस हे सत्य मान्य करणं आणि मग ते दिवसें दिवस अंगवळणी पाडणं म्हणजे सावरणं.तुझ्या शिवाय जगण्याची सवय करणं हे सावरणं. तू नसल्याचा दु:ख कधीच कमी होणार नाही पण त्या दु:खासहीत जगायला शिकणं म्हणजे सावरणं.  सर्वांना वाटतं  दिवसातल्या रडू यायच्या घटका कमी झाल्या की  सावरले असं म्हणायचं.तेव्हाच मला कित्येक लोक म्हणाले कि तू पटकन सावरलीस.... हो ना डोळे सावरले हो मी मनाचं काय? 

आता एक वर्ष होऊन गेलं या घटनेला पण मनातली ती भीती, तो थरकाप कायम आहे. अशाश्वतता प्रत्येक पुढे जायच्या मार्गात भीती दाखवते. पुढचा श्वास आहे कि नाही याची खात्री नाही आणि पुढचे मार्गक्रम आखायचे? आणि आपणही असेच अचानक निघून गेलो तर उरलेल्यांनी त्या भग्न स्वप्नांची आठवण काढत आसवं गाळायची. मग का बघायची एकत्र  स्वप्नं आणि का रचायचे मनोरे  ? हे सगळे प्रश्न पडतात. पायातली ताकद कमी होते , हो पण काही काळापुरतीच. मनच मनाला समजावतं. जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ त्यासाठी आत्ताचे चांगले दिवस का हातातून निसटू देतेस आणि भूत काळातली दु;खं, भविष्याच्या चिंता सोडून हा क्षण  सोनेरी बनवू  असा कौल मिळ्तो  मनाचा.तुझी उत्स्फूर्तता , तुझी चिकाटी सगळा आठवतं .पुन्हा मन भरारी घेतं.आई म्हणते कि मंदार शिवाय जगण्याला पर्याय आहे का आपल्या पुढे? नाही नां मग जगायचं तर उमदे पणाने जगा .रडत खडत नाही. पण माहितीये,मजा करण्याचा अट्टाहास होता तू असताना, आता प्रयत्न करतोय आम्ही. कधी जमतं कधी फसतं तर कधी आत्ता लिहायले  बसले तेव्हासारखं धास्तावतं आणि म्हणतं 'भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते '. या भयावर मात करायची ताकद दे रे आमच्यात तरच पुढे जाऊन काहीतरी घडू शकेल हातून.

तुझी
मोनू 












Friday, October 19, 2007

ते ही नॊ दिवसः गतः

दिवाळीला यंदा देशात जायचं म्हणून खुप छान वाटतंय.तिथे दिवाळीची खरी मजा येते..उत्साह असतो, आनंद असतो. आपली लोकं असतात.वातावरण असत.आता घरची सुन म्हणून फराळ पण करायचा असतो. स्वतःच्या हातांनी करून सर्वाना खाऊ घालण्यात समाधानही असतं. पण आईच्या हातचा आयता फराळ खायला काय मजा यायची.लहानपणीची दिवाळीची ती सगळीच मजा आता नाही येणार. आता फक्त आठवायचं ते सगळं.
मी लहानाची मोठी कोकणात झाले.तिथे दिवाळी ही घाटावर होते तेवढी मोठी नसायची.पण आमच्या घरी व्ह्यायची मात्र मोठी. एकतर आमचं गाव गोव्याच्या खुप जवळ होतं. त्यामुळे आमच्याकडे शाळांना सुट्टी लागली की बरेच पाहुणे यायचे. गोवा, कोकण फिरायला म्हणुन. त्यामुळे घरी भरपूर मंडळी असायची.
नरक चतुर्दशीच्या पहाटे उठून अख्ख्या गच्चीच्या कडेने मेणबत्त्या लावायच्या.अंगणात पणत्या लावायच्या. घर कसं लख्ख उजळून निघायचं. घराचं ते देखणं रुप अजुन आहे मनात, डोळ्यात.
मग तेल, उटणं लावून अभ्यंगस्नान.अंगण खुप मोठं होतं त्यामुळे आईची रांगोळी पण भलीमोठी असायची. कधी विष्णूलक्ष्मी, शंकर पार्वती, गणपती असे बरेच देवदेवता तिच्या रांगोळीतुन उतरायचे अंगणात. तेही मोजक्या वेळात. फराळाआधी फटाके उडवणे कार्यक्रम असायचा. दादाचं बघून मीही हातात माळ पेटवून फुटायच्या आत फेकायची असले प्रयत्न करायचे.मजा असायची. फुलबाज्या पेटवून त्याची काडी वाकवायची आणि झाडावर फेकायची. कुणाची जास्त ऊंच जाते तो सही.

ते झालं की पुढची फराळाची तयारी. आई बाबा मुळात घाटावरचे असले तरी कोकणात रहायला येउन दशक लोटलं होतं. त्यामुळे कोकणातल्या रितीभाती आपोआप घरात आल्या होत्या. कोकणात दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळ तर करतातच पण नॆवेद्य असतो तो पोह्यांचा. त्याच असं आहे की त्या वर्षीचा भाताचा हंगाम नुकताच संपलेला असतो. त्या नवीन भाताचे पहिले पोहे देवाला ह्यादिवशी नेवेद्य दाखवूनच मग खाल्ले जातात. गूळ खोबर्याचे पोहे, फोडणीचे पोहे, हिंग खोबर्याचे पोहे असे बरेच पोह्याचे प्रकार केले जातात.त्यांचा आणि फराळाचा नॆवेद्य . सर्वात सही प्रकार म्हणजे हे पोहे म्हणजे आपले नेहमीचे दिसणारे पांढरे पोहे नसतात.हे लाल गावठी पोहे असत्तात. चवीला अत्यंत सरस ह्या नेहमीच्या पोह्यांपेक्षा.
आमच्या घरासमोरच एक पोह्याची गिरणी होती. दिवाळी जवळ आली की तिथे खुप गर्दी असायची. आम्ही मुलं खेळता खेळता त्या गिरणीत लपायलाही जायचो आणि येता येता काका मूठभर गरम गरम भट्टीतले पोहे द्यायचे हातात तेही खाऊन यायचो. खुप आवडायचे ते ताजे पोहे. (बहुतेक म्हणून ती जागाही आवडायची लपायला.गिरणी पण भली मोठी असल्याने कोणाला त्याचा त्रास नाही व्हायचा.आई बाबाच रागवायचे कधीतरी सारखे नका तिकडे जाऊ म्हणुन.) तर असा पोहे आणि चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळी असा सगळा फराळ व्हायचा.
संध्याकाळी लक्ष्मीपूजन असायचं. मस्त नवीन कपडे घालून मिरवायचं. बाकी पूजेपाशी माझी लुड्बूड नसायची.बाहेर अंगणात मॆत्रिणी किंवा आलेल्या पाहुण्यामधले समवयस्क मिळून धिंगाणा चालू असे. पाडव्याला मला लहानपणी काही खास मॊज वाटत नसे. सहाजीक आहे म्हणा पाडव्याची खरी मॊज आता. (कमाई असते ना...) आई छान छान पदार्थ करायची मात्र.बाबाही येइल त्याला आत बोलावून काही ना काही तरी खायला लावायचे. आमच्या घरासमोर एक गॅरेज होत. तिथे काम करणारी मुलं बाहेर गावची होती. ती दिवाळीला त्यांच्या घरी नसत जात. मग बाबा त्यांना घरी बोलवायचे फराळाला. खुश व्ह्यायची ती मुलं एकदम. आईच्या हाताला चवच तशी आहे म्हणा.
तेव्हा भाऊबीजेला मात्र खुप मजा यायची.दादाला तेल लावून अंघोळ.चांगला रगडून घ्यायचा माझ्याकडून.पण मलाही छान वाटायचं. मग ओवाळायचं, ओवाळणी घ्यायची. मजा होती.
अशी जायची आमची दिवाळी. जसजसे मोठे होत गेलो तसतशी दिवाळी बदलत गेली. आधी बाहेरगावी शिक्षणाला गेलो.काहीवेळा यायला नाही मिळायचं घरी दिवाळीला.नंतर सगळेच पुण्यात राहू लागलो.पुण्यात घरातले सगळेच असल्याने पुन्हा दिवाळी दणक्यात व्हायची.
आता देशाबाहेर असतो. घरी सगळं करते मी फराळाचं. मित्र, मॆत्रीणी जमतो, मजा करतो. पण मन मात्र आठवत बसतं ते दिवस. आता बांद्यातलं ते घर पण नाही आणि बाबाही नाहीत म्हणजे ते दिवस पुन्हा कधीच दिसणार नाहीत. म्हणून की काय माहीत नाही पण त्या आठवणी रम्य असूनही मन त्यात न रमता कातर होतं.
ते ही नो दिवसः गत:!!!!

Thursday, June 7, 2007

भेटी लागे जीवा

औगस्ट २००३ चा काळ. दादा नुकताच दुबई ला नोकरीनिमित्त गेलेला. मनात बाबांची चिंता कायम होती.बाबा गेली ३ वर्ष सतत आजारी असायचे. आणि आजार साधेसुधे नसायचे.त्यांना कित्येको वर्ष मधुमेह होता त्याचाच परिणाम होता तो. डावा पाय गुडघ्यापासुन काढलेला. Diabetic Gangrene झाला होता. त्या शस्त्रक्रियेनंतर नवीन Artificial limb लावेपर्यंत वर्ष लागलं. त्यात शरीरातील ताकद कमी झालेली त्यामुळे तो नवीन पाय लावून चालणं पण अवघड जायचं. Post operation healing was really a difficult part. ऒपरेशन नेहमी नीट व्हायचं त्यांचं. पण पुढचे हाल बघवत नसत. तरी अचाट सहनशक्ती असलेला माणुस. पाय कापल्यावर अशक्य वेदना होत होत्या पण तोंडातुन एक ब्र नाही निघाला. शांत पणे पडुन रहायचे. पायातुन कळ आलेली फ़क्त चेहरा सांगायचा. आईने अखंड सेवा केली मात्र. करत करत ते नवीन पाय लावून बर्यापॆकी चालू लागले.
त्यातुन सावरतात तोपर्यंत दुसरा पायात अशक्य वेदना होऊ लागल्या. सगळ्या तपासण्या झाल्य़ा. त्यातून असं निष्पन्न झालं की त्याही पायात मधुमेहा मुळे रक्त्वाहिन्यात अडथळे निर्माण झालेत. झालं पुन्हा एकदा operation just like angioplasty. फ़क्त पायाची एवढाच काय तो फ़रक. झालं नेहमीची सगळी post operative complications झाली. इतके थकायचे ना ते हे सगळं सहन करुन. एका पायाची शीर काढुन दुसर्या पायात घातली होती. दोन्ही मांड्याना ३०-३० टाके. टाके म्हणजे स्टेपलर च्या पिना होत्या. त्यात औषधांनी तोंडाची चव गेलेली. सगळे सांगताहेत नीट खा नाहीतर ताकद नाही येणार. बिचारे सगळं शांतपणे सहन करायचे. असं होत होत त्यातुनही बरे झाले.
त्याच वेळेस मी अभियांत्रिकी ची पदवी परीक्षा पास झाले होते. नोकरी साठी भटकंती चालू होती. दादाने सुध्दा दोनेक महिन्यात नोकरी बदलली. त्याला नवीन नोकरीला रुजु होऊन कसातरी आठवडा झाला असेल आणि अचानक एक दिवशी बाबांना जोरात थंडी वाजु लागली. रायगर म्हणतात तशी. त्याना जागचं हलता येईना आणि ग्लानी आली. मी आमच्या बिल्डींग मधील वॆद्यांना बोलावलं तर ते म्हणाले की लगेच इस्पितळात नेऊ. त्यांनी स्वत: त्यांना खांद्यावरून उचलून खाली गाडीपर्यंत नेलं आणि स्वत:च्याच गाडीतून घेऊन गेले. ह्यावेळेस किड्नी बाई रुसल्या होत्या . बर्याच तपासण्यांनंतर निदान झालं की त्यांच्या किड्नी मध्ये विषारी वायु तयार झाला आहे आणि तो कधीही बाहेर पसरु शकतो. त्यामुळे किड्नी अलगद बाहेर काढणं आवश्यक आहे. भयंकर नळ्या आणि त्यांच्या जाळ्यात ग्लानीत असलेले बाबा. त्या काळातल्या असंख्य रात्री आम्ही धसक्यात घालवल्यात. त्यांनी तर त्या कशा घालवल्या असतील देवच जाणो. एके दिवशी त्यांची ही किडनी सहीसलामत बाहेर निघाली आणि जीवावर बेतलेलं हे संकट तात्पुरतं का होईना टळलं.
त्यातुन ते बरे झाले. हिंडु फिरु लागले. कोकणात आले आमच्याबरोबर. दादासाठी मुलगी पाहायला. लग्न ठरलं, सर्व नातेवाईंकाच्या सहकार्याने छान पार पडलं.

नागीण, पाठीवर एक कार्बंकल असे काही आजार चालूच होते.
एकच किड्नी आहे आता तिच्यावर सगळा भार येणार आणि त्यामुळे तिच्यातही बिघाड होणार हे स्पष्टच होतं. फ़क्त मधे किती काळ जातो हेच काय ते होतं.

दादाला दुबईतली नोकरी सांगुन आली होती. त्याचं करियर आपल्यामुळे रोखलं जातंय म्हणुन बाबा त्याच्या जाम मागे होते की तु जा. ते म्हणायचे "मला बघायचं आहे तुला यश मिळवताना.संधी सारखी मिळत नसते, मी काय आज आहे उद्या नाही, माझी काळजी करत नको बसु". त्यांच्या आग्रहा खातर दादाने ती नोकरी स्वीकारली आणि तो १२ औगस्ट २००३ ला रवाना झाला.
मी , आई, बाबा , मंजु(माझी वहिनी, दादा एकटाच गेला होता, काही महिन्य़ांनी ती जायची होती), मंजूचा भाऊ मिलींद असे पाच जण घरी असायचो. घरातलं वातावरण छान ठेवणे ही बाबांची खुबी होती. इतकी आजारपणं झेलली पण कधी वातावरण सुतकी नव्ह्तं, कारण बाबा.ते खुप मस्त गाणी म्हणायचे. तसं अख्खं घरच संगीतमय असायचं. आई शास्त्रीय संगीताचे क्लास घ्यायची.मजा असायची घरात.

एक महिना तसा नीट गेला. किड्नी हळुह्ळु रंग दाखवत होती. माझे बाबा स्वत: डौक्टर होते त्यामुळे त्यांना पुढे काय याची कल्पना आलेली असायची पण सांगायचे नाहीत. एक दिवशी आईच्या लक्षात आलं की त्याना लघवी होत नाहीये म्हणुन. तेव्हा म्हणाले हो , नाही होत आहे २ दिवस. तुम्ही लगेच इस्पितळात न्याल म्हणुन सांगितलं नाही.त्याच दिवशी त्याना जुलाब चालू झाले. आम्ही दादाला फ़ोन लावला तर त्याला म्हणे "मी मजेत आहे तु नको काळजी करु. हे सगळे उगाच घाबरतात".
दादा काय समजायचं ते समजला.
आम्ही बाबांना पुन्हा एकदा इस्पितळात नेलं.डौक्टरनी सांगितलं की त्याच्या किडनीने काम करण बंद केलं आहे नी त्यामुळे लघवी न होता मलमूत्र सगळं एकत्रच मलावाटे बाहेर पडतंय. त्यामुळे दर तासाला त्याना पाण्यासारखे जुलाब व्हायचे.
त्याना जगायला डायलिसीस हा एकमेव उपाय होता.बाबा तयार नव्ह्ते. ते म्हणत होते" मला घरी न्या. आता जास्त दिवस नाहीत माझे. ते मला घरी घालवायचे आहेत.इथे नको वाटतं अगदी.".
तिकडे दादा बाबांना एकदा तरी भेटायचंच म्हणून यायच्या खटपटीत होता.रजा लगेच मंजूर झाली. पण त्याच्या पासपोर्टवर अजुन व्हिसा स्टॆंपिंग व्हायचा होता. नुअकताच गेलेला असल्याने काही सोपस्कार व्हायचे होते त्यापॆकी हा एक. हे काम लवकर व्हावं म्हणून त्याचा मॆनेजर पण बरीच खटपट करत होता. पण नेमकी ३ दिवस जोडुन सुट्टी आली दुबईत. सर्व सरकारी कचेरया बंद. हातावर हात धरून बसण्यापलिकडे कोणीच काही करू शकत नव्हतं.बाबांना भेटायला मिळेल ना? अनिवार इच्छा होती दोघांनाही एक्मेकाला भेट्ण्याची.तळमळत दिवस रात्र कंठत होता,पण येऊ शकत नव्हता.त्याच्या परिस्थितीची कल्पना तेव्हाही करवत नव्हती आणि अजूनही आठवलं तरी खुप त्रास होतो.

बाबांना, आता तुम्हाला दादाला भेटायचं ना, तो येतोय..असं सांगुन डायलिसीस साठी तयार केलं.डायलिसीस साठी एक वेगळं दालन होतं. तिथे आम्हाला पेशंट बरोबर थांबायची परवानगी नव्हती.मी मधेच भेटुन येत असे. मी अशीच एकदा आत त्यांना भेटायला गेले होते. त्यांचा हात हातात घेऊन उभी होते. बाबांच्या डोळ्यातुन पाणी ओघळत होतं." आत्ताच तर गेला मंदार, त्याला लगेच माझ्यामुळे यावं लागतंय, मला खुप अपराधी वाटतंय, तुम्हाला सर्वानाच माझ्या आजारपणामुळे खुप त्रास होतो.पण खरं सांगु, मला पण मंदारला भेटायचंय एकदा.कधी पर्यंत येईल तो?".मी काय सांगणार? काही तरी सांगुन वेळ मारुन नेली. तितक्यात त्यांच्या चेहर्यातील बदलाने मला लक्षात आलं की त्यांना पुन्हा शौचाला झालंय.मी त्यांना साफ करण्यासाठी नर्स ला बोलावू लागले.(डायलिसीस च्या दालनात आम्हाला हे करण्याची परवानगी नव्हती)बाबा म्हणे " नको बोलावू कोणाला, मला ती सर्वांसमोर उघडं टाकते साफ़ करताना आणि मला ते खुप दीनवाणं वाटतं, त्यापेक्षा मी असाच अजुन थोडा वेळ काढतो. एकदा रुम मध्ये आलो की कर साफ़". काय काय सहन केलं त्यांनी. अजुनही तेवढंच दु:ख आहे मनात..बाबांचे खुप हाल झाले.आयुष्यभर कोकणात पेशंट्ची सेवा केली. खुप कष्ट काढले पण आजारपण, हाल काही चुकले नाहीत.
२१ सप्टेंबर २००३ , रविवारी त्यांना आम्ही इस्पितळात आणलं होतं. अख्खा आठवडा संपत आला होता.एक दिवसाआड डायलिसीस चालु होता. दुसरा रविवार उजाडला. बाबाना बसवलं होतं बेड वर. आई त्यांचा चहा कपात ओतत होती. दाराचा आवाज झाला म्हणुन पाहिलं तर दारात दादा!!! त्याने धावत येऊन बाबांना कडकडून मिठी मारली.आसवांना मुक्त वाट दिली त्यादिवशी सर्वांनीच.भेटीलागे जीवा लागलीसे आस..खरंच अवर्णनीय होता तो क्षण..आस भागली होती.

बाबा प्रचंड खुष होते. दादाला लगेच सांगुन टाकलं , "तुझ्यासाठी मी २ कामं ठेवली आहेत.एक म्हणजे मोनुचं लग्न आणि मला घरी न्यायचं.हे कोणी माझं ऎकत नाहीत. तु ऎक.मला घरी ने."
माझं आणि अतुलचं लग्न ठरुन दीड वर्ष झालं होत. लवकरच लग्न करणारही होतो पण आता या कारणाने अतुलच्या एका दिवसाच्या सुट्टीत आमचं लग्न मंगळ्वारी ललिता पंचमीच्या मुहुर्तावर पार पडलं. त्याच दिवशी बाबांना घरी पण आणलं.बाबा खुष होते.
त्यानंतर त्यांनी जेवण बंद केलं. नकॊ आता काही म्हणायचे.आई,दादा, मी, मंजु सर्वाना बसवुन सांगितलं " मला खरंच तुमच्या सगळ्यां बरोबर रहायचंय पण आता शरीर साथ नाही देतेय.म्हणुन मी देवाकडे प्रार्थना करतोय की मला सोडव आता. तुम्हीही करा माझ्यासाठी."

शनिवारी, ४ औक्टोबर २००३ ,दसर्याच्या पहाटे २ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


.... मोनाली

Friday, May 4, 2007

बगळ्यांची माळ फ़ुले


कोणतं गाणं कधी आपल्या मनाचा ताबा घेईल याचा काही नेम नसतो.काही महिन्यांपुर्वी वसंतराव देशपांडे यांचं 'बगळ्यांची माळ फ़ुले' हे गाणं सवार होतं माझ्यावर. वसंतरावांची गाणी तशीही मला खुप आवडतात. त्यांचा किंचीत अनुनासिक स्वर,ताना घ्यायची लकब खास आहे.
'बगळ्यांची माळ फ़ुले ' मधे तर वा. रा. कान्त यांचे शब्दही तेवढीच दाद मिळवतात. श्रीनिवास खळेंचं संगीत केवळ अप्रतीम!!! 'फ़डफ़डणे पंखाचे शुभ्र ऊरे मागे , सलते ती तडफ़ड का कधी तुझ्या उरात'' .. किती आर्त आहेत त्या ओळी आणि त्याचे सुर.... प्रत्यक्षात ज्ररी हा अनुभव नसला तरीही त्या अवस्थेची अनुभुती देतं हे गाणं. कितीतरी दिवस हे गाणं सतत ऎकलंय मी आणि अजुनही लूप मधे टाकून ऎकते.

Thursday, May 3, 2007

गाणं 'सवार' होतं

सर्वांना याचा अनुभव आहे की नाही माहीत नाही पण मला तरी असं होतं गाण्याच्या बाबतीत. गाणं चढतं. हा शब्दप्रयोग कुणाकडुन ऎकला की मलाच सुचला हे ही आता मला आठवत नाही खरंतर...बहुतेक नशा चढणे यावरुन आला असेल. किंवा हिंदी मधील 'सवार' या शब्दवरुन.पण तो मनोमन पटला ही गोष्ट खरी. सारखं तेच गाणं आठवतं, तेच ऎकावसं वाटतं, समोरच्याला ऎकवावंस वाटतं(बिचारा.. ). सतत त्याच धुंदीत... म्हणजे त्यावेळी दुसरी गाणी आवडत नसतात असं नाही..पण सारखं ऎकायचं एकच 'ते' गाणं. समोरील माणसाला उगीचच त्या गाण्यातील भावलेल्या जागा,सॊंदर्यस्थळं सांगत बसायचं.. हे आणि असं बरंच काही. काही कालांतराने हे गाणं उतरतं म्हणजे आवडत नाही असं होत नाही हं..तर ते बाकीच्या आवडत्या गाण्य़ांच्या रांगेत जाऊन बसतं.आवडत्या गाण्यांची यादी तर खुप मोठी असते.त्यातली सवार होणारी, मनावर राज्य करणारी ही काही गाणी. गाण्याच्या या चढण्या उतरण्यावर तसा आपला काहीच ताबा नसतो. एखादं दुसरं तितक्याच ताकदीचं गाणं कानावर पडलं की आपोआप त्या गाण्याची धुंदी चढते. तोच नेहमीचा झपाटलेपणा. हां, कित्येक दिवस कोणतंही गाणं सवार न होता नुसती आवडती गाणी ऎकण्यातही जातात.