Thursday, May 3, 2007

गाणं 'सवार' होतं

सर्वांना याचा अनुभव आहे की नाही माहीत नाही पण मला तरी असं होतं गाण्याच्या बाबतीत. गाणं चढतं. हा शब्दप्रयोग कुणाकडुन ऎकला की मलाच सुचला हे ही आता मला आठवत नाही खरंतर...बहुतेक नशा चढणे यावरुन आला असेल. किंवा हिंदी मधील 'सवार' या शब्दवरुन.पण तो मनोमन पटला ही गोष्ट खरी. सारखं तेच गाणं आठवतं, तेच ऎकावसं वाटतं, समोरच्याला ऎकवावंस वाटतं(बिचारा.. ). सतत त्याच धुंदीत... म्हणजे त्यावेळी दुसरी गाणी आवडत नसतात असं नाही..पण सारखं ऎकायचं एकच 'ते' गाणं. समोरील माणसाला उगीचच त्या गाण्यातील भावलेल्या जागा,सॊंदर्यस्थळं सांगत बसायचं.. हे आणि असं बरंच काही. काही कालांतराने हे गाणं उतरतं म्हणजे आवडत नाही असं होत नाही हं..तर ते बाकीच्या आवडत्या गाण्य़ांच्या रांगेत जाऊन बसतं.आवडत्या गाण्यांची यादी तर खुप मोठी असते.त्यातली सवार होणारी, मनावर राज्य करणारी ही काही गाणी. गाण्याच्या या चढण्या उतरण्यावर तसा आपला काहीच ताबा नसतो. एखादं दुसरं तितक्याच ताकदीचं गाणं कानावर पडलं की आपोआप त्या गाण्याची धुंदी चढते. तोच नेहमीचा झपाटलेपणा. हां, कित्येक दिवस कोणतंही गाणं सवार न होता नुसती आवडती गाणी ऎकण्यातही जातात.


2 comments:

तात्या अभ्यंकर. said...

मोनाली,

तुमच्या विचारांशी पूर्णत: सहमत आहे. गाणं अक्षरश: सवार होतं असंच म्हणावं लागेल..

तात्या.

मोनाली said...

धन्यवाद तात्या. सहविचारी भेट्ल्याचा नेहमीच आनंद होतो.