Friday, September 20, 2019

सत्राणे उड्डाणे होकार वदनी



सध्या Activa, kinva बुडाखाली  तात्कालिक जी काही गाडी असेल तीवर बसून हा महानुभाव पुण्याच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत कुठेही असतो.  फिरतीचे मूळ कारण  त्याचा व्यवसाय आणि त्या अनुषंगाने असणारी कामे एवढेच मर्यादित कधीच नसते. एका टोकाला काम असतं तर दुसऱ्या टोकाला कोणीतरी आजारी असतं, कुणाला तरी याला प्रत्यक्षच भेटून खाजगी सल्ला घ्यायचा असतो नाहीतर गेला बाजार माझ्यासारखं कोणीतरी दुसऱ्या देशात असतं आणि पार्सल तयार करून घेऊन ते आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आमच्या एखाद्या मित्राच्या पुण्यातल्या कोणत्या तरी टोकाला असणाऱ्या घरी द्यायचं असतं.. ही फक्त वानगीदाखल दिलेली काही कारणं...  पण तू त्याच्या काळजीने कुठे आहेस रे उगाच तुला फेरी नको त्याबाजुला असशील तरच एक काम आहे असं फोन वर म्हणलं तर दुसऱ्या बाजूने ऐकू येतं की तू काम सांग मी कुठेही असतो. आईच्या mri साठी जोशी हॉस्पिटल बाहेर याच्याशी बोलत असताना त्याच्या या परोपकारी फिरतीला एक साजेसे नाव सापडलं.... सत्राणे उड्डाणे होकार वदनी... मी चुकून होकार लिहलंय असं वाटू शकेल पण मला होकार च लिहायचं आहे कारण  नेहमी होकारच असतो असतो याच्या वदनी. हे सगळं ज्याच्या विषयी बोलतेय त्याचा अनुभव माझ्यासारख्या असंख्य लोकांनी घेतला असेल, त्यांना नाव सांगायची गरज ही पडणार नाही पण तरीही...तर हा आहे आपला सर्वांचा जयंता. 

2 सप्टेंबर ला तारखेने  तर हरतालिके ला तिथिने. माझ्या आईच्या भाषेत गोडबोले घराण्यातला हा हरतालिके चा चुळबुळा गणपती.लहानपणापासून एका जागेवर टिकला तर शप्पथ. आळस ही गोष्ट ना लहानपणी होती ना आता पन्नाशीच्या पुढे गेला तरी आहे. एखादं काम एका मार्गाने सुरुवात करून होत नसेल तर त्याला विविध पद्धतीने approach करायची तयारी आणि त्यासाठी जीवाची धडपड. आणि हो, ते काम त्याचं असेल किंवा त्याच्या फायद्यासाठी असेल असं नाहीच बरं का. अनंत मित्र, प्रचंड ओळखी, आणि त्या ओळखीचा अतिशय सुयोग्य ठिकाणी वापर ही खासियत .  उगाच आहे ओळख म्हणून काहीही  चाललय असं नाही. माझ्यासह बऱ्याच जणांना असं झालं असेल की पुण्यात  प्रोब्लेम कोणताही असो उपाय एकच... जयंताला फोन😍 

खूप निखालस वृत्तीने मदत आणि मोबदला म्हणून आंतरिक समाधान. काहीवेळा गरज सरो वैद्य मरो असे  अनुभवही येतात पण तो छान सांगतो की हे करून मला आनंद मिळतोय हाच माझा स्वार्थ.  समोरच्या माणसाने माझ्याशी कसं वागावं हे तो ठरवेल, मी माझं स्वत्व त्यामुळे सोडणार नाही. कोणी काही म्हणो, वागो, आम्हां काय त्याचे.....आमच्या  आधुनिक संत वाणीत याला " पोचलेला असणे" म्हणतात. 😃

माणूस म्हणून घडताना आणि हळूहळू मोठं होताना मी जयंताला खूप जवळून पाहिलय. स्वतःमधील त्रुटी ओळखून त्यावर प्रयत्नपूर्वक मात करणं सुद्धा पाहिलंय. स्वतःच्या अडचणी न सांगता  वेळ मारून न्यायला तिसरच काहीतरी करत राहिल्याने सहज गैरसमज व्हायला संधी दिल्या याने पूर्वायुष्यात. पण ज्या अडचणीतून तो त्या काळात जात होता ते कळल्यावर गैरसमज तर सोडाच पण तू आम्हाला तुला मदत करायची संधी का नाही दिलीस याचीच खंत वाटेल एखाद्याला.

यशाची खात्री नसताना , काहीवेळा तर हाता तोंडाशी आलेलं यश हलकेच विरून जाताना, पुन्हा उभ राहून  कष्ट करण्याची असामान्य जिद्द  आहे याच्याकडे. ज्याचं राहून राहून कौतुक वाटतं मला. यश दिसताना त्यामागे धावणं सोपं असेल कदाचित पण यश कायम हुलकावण्या देत असताना त्यामागे धावणारा आणि ते मिळवणारा जयंता जगात विरळाच. अशक्य प्रेरणादायी वाटतं मला हे माझ्या आयुष्यातील खाचखळग्यातून वाट काढताना.
प्रत्येक कामात extra mile जायची तयारी. कितीतरी दिवंगत मंडळी स्वर्गात आज जयंताच्या जीवावर निश्चिंत असतील कारण त्यांच्या मागे या भूतलावर राहिलेल्या त्यांच्या कुटुंबाबरोबर जयंता आहे. आणि हो त्याला मोलाची साथ देणारी त्याची जीवनसाथी विनया वहिनी. त्याची नाती, आमच्यासारखे काही सोडता, बहुतांशी जोडलेली पण दोन्ही, वहिनीने मनापासून स्वीकारली, जपली. लेकिवरही या दोघांचे हे संस्कार न झाले तर नवलच. त्यामुळे तीही या युगातली  contemporary yet traditional  असा लोभस संगम आहे.

जयंताविषयी लिहायला प्रसंग खूप आहेत पण किती लिहिणार आणि मग एखादा दुसरा प्रसंग लिहून त्याच्या व्यक्ती चित्राला न्याय नाही देता येणार म्हणून  माझ्या परीने outline sketch करतीये. प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रसंगाने त्याला fill up करायची मुभा घ्यावी. त्याशिवाय समग्र जयंता मांडणं अवघड आहे.

अथक परिश्रम आणि प्रचंड चिकाटी  जोडीला निरपेक्ष माणुसकी अजुन काय पाहिजे एक "माणूस" घडायला. अशा या माणसाला,  माझ्या ज्येष्ठ बंधुरायाला उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो ही ईश्र्वरचरणी प्रार्थना🙏

अदिती हिरणवार ( मोनाली गोडबोले)

मन चिंब पावसाळी

कवितेच पानचे ना धों महानोर यांच्याबरोबर असलेले 2 भाग पाहिले आणि इतके दिवस बांध घालून ठेवलेल्या पावसाच्या आठवणी बेबंध वाहू लागल्या, डोळ्यावाटे.

मन चिंब पावसाळी
झाडात रंग ओले
घन गर्द सावल्यानी
आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या अंगात थेंब थेबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी

मुक्ता सिनेमा मधे सर्वात प्रथम ऐकली होती ही कविता. अतिशय आवडली होती. आता तर कोकणातला पाऊस आठवून कातर करते ती मला.
बांद्याच्या घरात बसून मुसळधार बरसणारा पाऊस पहायचो. स्वयंपाक घरातल्या मागच्या दारातून हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहायला मिळायच्या पावसात. पोपटी रंगाच्या भाताच्या तरव्या पासून ते चढत्या क्रमाने झाडांची उंची आणि हिरव्या रंगाचं गडद होणं दिसायचं. तरवा ते माड (नारळाचं झाड). कित्येक दिवस अन कित्येक पावसाळे आम्ही हे चित्र पाहायचो. घराच्या कौलांवर थैमान घालणारा पाऊस त्या शेतात मात्र मोहक दिसायचा. आधी आभाळून येणं, येण्याची चाहूल आणि मग गर्जना करत अविरत बरसण. आषाढ महिन्यात येणारा वेगळा, श्रावणात येणारा वेगळा, त्याला सृष्टीने दिलेला प्रतिसादही वेगळा.
लहानपणी कळलही नव्हत की हा पाऊस मनात इतका घर करून बसणारे, की तो नुसता आठवून मला कसं नुसा करेल...
 रात्री जोरात पाऊस आला की हमखास वीज खंडित व्हायची. काळाकुट्ट अंधार, तुफान पाऊस आणि छोटीशी मेणबत्ती लावून आधी परवचा आणि मग गाणी म्हणणारे आम्ही. संध्याकाळ मस्त जमून यायची. अंधारात फार काही नको म्हणून आई पटकन एखादा मसालेभात किंवा कांद्याची  खमंग आमटी भात करायची. सर्वांनी एकत्र बसून गप्पा मारत ओरपायचा. जाम आवडायची अशी संध्याकाळ, रात्र मला.
त्यात दारावर थाप वाजली की मात्र मला जाम भीती वाटायची कारण कोणीतरी बाबांना visit sathi बोलवायला आलेलं असायचं. क्षणाचाही विलंब न करता बाबा त्या  माणसा ला घेऊन मोटार सायकल वरून निघायचे. आम्ही झोपी जायचो मग पण मनात धास्ती असायची माझ्या. कान गाडीच्या आवाजाची वाट पाहत असायचे. घराजवळ कोपऱ्यावर वडाचं मोठं झाड होतं, तिथे आले की गाडीचा आवाज यायचा. मग निर्धास्त झोप लागायची. कधी कधी बाबा रात्रभर visit var असायचे. मला मात्र माहीत नसायचं तेव्हा की ते गेलेत.
घरात सर्वांनी एकत्र बसून पाहताना आवडणारा पाऊस मला बाबा बाहेर गेले की भीतीदायक वाटायचा.  पण तात्पुरता.
पाऊस भीषण रूप घेऊ याचाही अनुभव घेतलाय कोकणात पण आठवतं, हुरहूर लावत ते त्याचं शेतात बरसताना दिसणारं लोभस रूप.
भारताबाहेर अनेक वर्ष राहतेय त्यामुळे या अनुभवाला गेली कित्येक वर्षं पारखी झालेय. इथेही पाऊस येतो, खरंतर सारखाच येतो, कधी बरसतो, कधी  बारीक रिपरिप... सुंदर दिसतं सगळं पण त्याला माझिया देशातल्या पावसाची सर नक्कीच नाही.  I miss you monsoon. I certainly do❤

मोनाली (अदिती हिरणवार)

आई - जीवन प्रवाह

रामनवमीच्या पूर्व संध्येला बांद्यात आईला श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित केला आहे . त्यानिमि त्ताने दादाच्या मित्राने आईबद्दल लिहून पाठवायला सांगितलं होतं.

खरं  सांगायचं  तर आईच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाबद्दल आणि अनुभवसंपन्न आयुष्याबद्दल  थोडक्यात लिहिणं खूप अवघड आहे .  प्रयत्न करते.
आई मूळची सांगलीची . लहानपण अतिशय खडतर गेलं . आईची आई , आई खूप लहान असताना गेली. सावत्र आईने भरपूर छळ केला . वडिलांचं  घराकडे फार लक्ष नव्हतं . एकूण सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तिने औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला नर्सिंग कोर्सला ऍडमिशन  घेतली . ३. ५ वर्षे शिक्षणासोबत हॉस्पीटल मध्ये   वेगवेगळ्या वॉर्ड्समध्ये  ड्युटीवर असताना पेशंट्सची मनोभावे सेवा केली .  परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण  झाली.  नोव्हेंबर १९६७ मध्ये माझी आई कुसुम कानिटकर ची  सौ . मोहिनी गोडबोले  उर्फ  मामी बनून बांद्यात आली.
 सासू सासरे,त्यांची आजारपणं ,पुतण्या , पुतणी, असंख्य  पाहुणे त्यांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालणे यात तिचा बराच वेळ  जायचा.पण ते तिने मनापासून केलं .  तेव्हाचं  बांदा खूप वेगळं  होतं. आईला खेड्याची फारशी सवय नव्हती पण हळूहळू ती रुळत गेली.  बांद्यात बायकांनी बाजारात जायची प्रथा नव्हती .आईने प्रथमच  स्वतःला  घरात लागणारं  वाणसामान आणि भाजी स्वतः  खरेदी करायला  सुरुवात केली . जरा वेळ लागला पण बांद्याने  हा बदल स्वीकारला. आईने भजनी मंडळ  सुरु केलं . स्त्रियांना    छोटं  का होईना पण  स्वतः चं  असं एक विश्व असावं असा तिचा  आग्रह असायचा . घर, मुलं ,सासू सासरे सांभाळून तिने स्वतः  तिचं  छोटंसं  जग तयार केलं  होतं . माणसाला पूर्ण  क्षमतेने अखंड काम करण्यासाठी थोडासा विरंगुळा असणं गरजेचं  आहे असं  म्हणायची . पण तो विरंगुळा म्हणजे नुसती मजा नाही तर हातून सत्कर्म  घडत  राहायला हवं . आधी भजन नंतर बालवाडीत जाऊन मुलांना गाणी शिकवणे ,शाळेत परीक्षक म्हणून जाणे , मंगळागौर खेळणे असा बरच काही ती करायची.  नंतर तर प्रसूतिगृह . १००० च्या वर बाळं  जन्माला आली . प्रसूत झालेल्या स्त्रियांना योग्य तो आहार मिळतो कि नाही यावर तिचं  लक्ष असे. रात्री अपरात्री प्रसूती झाली तर चहा ,कण्हेरी वगैरे  आमच्या घरात बनवून बाळंतिणीला खाऊ  घातलं  जायचं .स्वच्छता , योग्य असा आहार , बाळाची निगा काटेकोरपणे राखली जायची. १० दिवस आईच्या प्रसूतिगृहात बाळंतीण माहेरपण अनुभवून जायची .  कित्येक मुलींना मी आईकडून घरी जाताना रडलेलं  पाहिलंय . स्वतःला आईचं  प्रेम मिळालेलं  नसताना , तिच्यात  एवढी माया,आईपण कुठून भरलं  होतं  देव जाणे . खूप लोकं  जोडली तिने तिच्या या स्वभावामुळे. अगदी शेवटच्या आजारपणात लंडन च्या हॉस्पिटलमध्ये असताना तिथल्या नर्सेस सुद्धा तिच्या प्रेमात होत्या. प्रत्येकीची आपुलकीने चौकशी करायची जेवणाखाण्याची , दमल्या भागल्याची. मग त्या पण अगदी आवर्जून आईची चौकशी करायच्या . भाषा , वर्ण,जात तिने कधी माणूसपणाच्या आड नाही येऊ दिल्या .

आईचं  आणि डॉ  खानोलकर यांचं  नातंही  अनोखं  होतं . तेही तिला धाकट्या  बहिणीप्रमाणे  प्रेम करत. त्यांनी एवढं  हक्काने  दुसया कोणाशीच वागताना मी पाहिलं  नव्हतं . आई बाबा यांच्यावर त्यांचा विशेष  जीव होता . माझे बाबा नेहमी म्हणायचे कि आईची मोलाची साथ मिळाली नसती तर त्यांना खानोलकर कटुंबासाठी जे काही करता आलं  ते नसतं  करता आलं . असे किती कंगोरे सांगू .

प्रसूतिगृह आणि क्लिनिक  मध्ये येणारे पेशंट्स सांभाळून तिने संगीत शिकायला सुरुवात केली. तिचे वडील उत्तम व्हायोलिन वादक होते, वारसाने आईला स्वरज्ञान होतं . बाबानी प्रचंड प्रोत्साहन आणि आईची कडी   मेहनत यामुळे  वयाच्या ५३ व्या  वर्षी ती उपांत्य विशारद झाली . त्याबरोबर  परसदारची  बाग तिने अतिशय मेहनतीने फुलवली होती . वांगी,मिरच्या , अळू ,काकडी , लाल भाजी असं  बरंच  काही ती पिकवायची. विविध फुलझाडं होती . आवडीने एक तरी फुल रोज डोक्यात माळायची .

बांद्यात महिलांचं  भजनी मंडळ उभारण्यातहि तिचा मोलाचा वाट होता. महिलां मधील संगीताच्या कलेला त्यामुळे उत्तम वाव मिळाला .  बांद्यातील महिला त्या निमित्ताने बाहेर पडू लागल्या.  आईला आणि महिलांना आयुष्यभराच्या जिवाभावाच्या सख्या  मिळाल्या .
१९९९ च्या शेवटी बाबांच्या आजारपणामुळे  तिला बांद्याचं  हे विश्व सोडून पुण्यात यावं लागलं.  बाग  नाही आता म्हणून वाईट वाटायचं तिला .  आता पुन्हा एकदा नवीन विश्व उभारायचं  होतं  तिला . पुण्यातही संगीताने जोरदार साथ दिली. दिवसभर घर, बाबांचं आजारपण  सांभाळून तिने संगीताचे क्लास  घ्यायला  सुरुवात केली . कोणतीही जाहिरात ना करता तिचे क्लास फुल  व्हायचे. भजनी मंडळात पेटीची साथ चालूच होती .  २००३ साली बाबा त्यांच्या किडनीच्या आजारपणाने गेले . आई त्यातूनही आम्हा मुलांसाठी हिमतीने उभी राहिली . मंदार, मंजू आणि ईशान यांच्या बरोबर सुखाने दिवस जात होते. २-३ वेळा लंडन ट्रिप झाली. लंडन मधेही तिला वेळ जायचा कधी प्रश्न नाही यायचा . मुलांच्या गाण्याच्या परीक्षेच्या वह्या लिहून काढायची , नवीन गाणी बसवणे, माझ्या मैत्रिणींच्या घरी जाऊन  त्यांना पाककलेचे धडे देणे अशा विविध गोष्टी करत राहायची.
२०११ डिसेम्बर मध्ये मात्र तिच्यावर फार मोठा आघात झाला. मंदारच्या जाण्याने  जगण्यातला आनंद हिरावला गेला . त्यातूनही  मंजू आणि ईशान साठी भक्कम उभी राहिली . आतून कितीही दुःखी  होती तरी त्यांना उभं  करायचं  म्हणून परिस्थितीवर मात करत राहिली.  मंजूचं  पुन्हा लग्न व्हावं  यासाठी प्रचंड झटत  होती .  ते जेव्हा झालं  तेव्हा ती प्रचंड खुश होती . स्वतःच्या म्हातारपणाला आधार हवा असा स्वार्थी विचार ना करता तिने मंजूच्या आयुष्याचा विचार केला  यातच तिच्या विचारांची प्रगल्भता कळून येते .
तिला शेवटी कॅन्सर सारखा गंभीर आजार झाला आणि त्यात तिला खूप यातना भोगाव्या  लागल्या पण तिने त्या तेवढ्याच  धीराने आणि संयमाने सहन केल्या . नशिबाने तिला अडचणी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दिल्या आणि आईने तितक्याच हिमतीने  त्यावर मात केली . असामान्य धीर आणि हळवं ,प्रेमळ  मन यांचा प्रचंड लोभस संगम तिच्या होता . जमा केलेली माणसं  हेच वैभव मानणाऱ्या आईच्या पोटी जन्माला  आलो हे भाग्य.


तिला तिची दैदिप्यमान कारकीर्द करायला बांद्याने उदंड सहकार्य केलं . त्यासाठी माझ्या कडून बांदेकरांना माझा मनापासून मुजरा !

🙏मोनाली

निर्णय 



बाबा तब्बल 4 वर्षं आजारी होते, हॉस्पिटल घर हॉस्पिटल अशा वाऱ्या चालू होत्या. अशक्यप्राय वेदना सहन करत अखेर वेळ आल्यावर ते या सगळ्यातुन सुटले. त्यावेळी खूप वेळा विनंती, गयावया करायचे की मला आता नका नेऊ हॉस्पिटलमध्ये. मला शांतपणे जाऊ द्या, शरीराला या आजाराच्या पिडेपेक्षा ती हॉस्पिटलमधली उपचारांची पीडा जास्त होते. आम्हाला तेव्हा ते काय म्हणताहेत हे कळलं नाही असं वाटतं आता. तेवढं वयही नव्हतं माझं आणि काही वेळा तर हे जाणवूनही प्रत्यक्षात आणायचं मानसिक  बळ नव्हतं त्यामुळे आजार, डॉक्टर आणि हॉस्पिटल याच्या भोवऱ्यात गिरक्या घेत राहिलो. बाबा घरी आले आणि ते आहेत हेच पुरेसं आहे असं वाटणारं ते वय.एका संध्याकाळी बाबांनी आम्हाला जवळ बसवून सांगितलं की तुमच्या बरोबर खूप वर्ष जगायला खूप मजा आली असती पण आता शरीर साथ देत नाहिये आणि आता सहन करण्याची परिसीमा आलीये तर आता माझ्यासाठी देवाकडे हात जोडा आणि प्रार्थना करा की आता बास. आईने खरंच देवापुढे उभं केलं आम्हाला आणि स्वतःही खंबीरपणे उभी राहिली देवासमोर प्रार्थना करायला. त्या रात्री बाबा गेले.  असा दावाच नाहीये की आमच्या प्रार्थनेमुळे त्यांची सुटका झाली, वेळ आली होती त्यांची पण आमच्या सद्भावना पोचल्या असतील एवढं नक्की आणि आम्ही ते असतील तसे असू देत पण आम्हाला बाबा हवेत याच्या पुढे जाऊन बाबांसाठी आत्ता काय योग्य आहे ते होऊ देत या विचारला पोचलो . विचार बाबांचा आणि ते आमच्याकडून आणि स्वतःकडून करवून घेणारी आमची असामान्य धीराची आई.

आज तिच्यावर आजारपणामुळे ओढवलेली परिस्थिती साधारणपणे तशीच.यापुढे आता काही हॉस्पिटल आणि वैद्यकीय उपचार करणार नसशील तरच पुण्यात जाउया या अटीवर ती माझ्याबरोबर पुण्यात आली. तू माझ्याबरोबर मी जाईपर्यंत अस एवढीच मागणी बाकी मला काही नकोय आता. माझ्या घरी सुखाने मरू देत आता. तिला पुढे होणाऱ्या वेदनेची जाणीव नाही असं अजिबात नाही. युके तल्या डॉक्टरला तपासणीसाठी गेलेलं असताना मला कॅन्सर झालाय का असं सरळ विचारणाऱ्या आईला त्यांच्या ' possibly yes'  या उत्तराने भविष्यात काय वेदनांना सामोरं जायचं  याची पूर्ण कल्पना असणार आणि आहे.
निदान करण्यासाठी MRI  करण्याला तिने तीव्र विरोध केला आणि आम्ही त्याचा आदर करून घरीच काय लागेल ते करू असं ठरवलं. बाबांच्या वेळचं वय नाहीये आता, आता आईसाठी, तिच्या सहनशक्ती कडे पाहून तिला हवा तसं घरच्या घरी उपचार आणि सेवा करूया हे कळण्याचं वय आहे. 40 व्या वर्षी पण आई मला कशी का होईना हवीच हा अट्टाहास नकोय हे नक्की. तिला आतातरी स्वतःसाठी , स्वतःला हवंतसं जाऊ देत हा विचार जोर करतो मनात. त्यासाठी मोठा विरोध, रोष पत्करतेय पण आईशी संवाद चालू आहे, तिच्या म्हणण्यानुसार आम्ही जे करतोय त्यात तिला समाधान आहे. तिची शारीरिक पीडा होमिओपॅथी च्या आमच्या डॉ जोशीराव यांच्या औषधाने जितकी कमी करू शकतो तितकी करायचा प्रयत्न चालू आहे.

हा घेतलेला निर्णय काहींना पटला ते आमच्या बरोबरीने तिच्या सेवेत आहेत, काही जण न पटूनही, तिच्यासाठी, स्वतःला पटलं नाहीये पण तो तिचा निर्णय आहे आणि त्याचा आदर करयचा आणि साथ द्यायची म्हणून बरोबर आहेत. काही जण हे काही पटलं नाही बुवा म्हणून पुन्हा तिला भेटायला यायचं टाळताहेत. या सर्व वावटळीत आई आणि तिची सेवा ही एकच गोष्ट घट्ट पकडून वाटचाल करताना खूप शक्ती खर्ची पडते.  प्रत्येकाच्या विचारांचा आणि त्या नुसार येणाऱ्या सल्ल्यांचा खरंच मनापासून आदर आहे कारण ते तीच्यावरच्या प्रेमापोटीच देताहेत यात तिळमात्र शंका नाहीये. पण ते सर्व सल्ले आत्ता तिच्यासाठी आणि तिच्या आत्ताच्या शारीरिक परिस्थिती आणि क्षमतेच्या कसोटीला नाही उतरले तर प्रत्यक्षात त्यानुसार वागणं आत्ता शक्य नाहीये हे ही समजून घ्यावी अशी अपेक्षा खरंच वावगी नाहीये का?

तिला घरी ठेवून तिच्या इच्छेला मान देणं जरी पटलं नाहीतरी तुमच्या , आमच्या, माझ्या आई साठी,  तिच्यासाठी योग्य असेल ते होऊ देत अशी प्रार्थना तर एकत्रितपणे नक्कीच करू शकतो ना?
माझ्याबरोबर असाल ना तुम्ही उभे किमान प्रार्थनेपुरते ?