Saturday, April 4, 2020

जिएं तो जिएं कैसे बिन आपके

तुझ्याशिवाय मी नाही राहू  शकणार असं मला अतुल भेटल्यावर म्हणालेले बाबा, खरंच नाही राहिले आमच्या लग्नानंतर. खूप मनाची शक्ती लागली बाबा गेल्यावर त्यातून वर यायला. कित्येक रात्री मधेच जाग यायची आणि मग बराच वेळ रडत जायचा. त्यांचा सगळा त्रास आठवून खूप कासावीस व्हायचं. आईला त्रास होईल म्हणून काहीच नाही बोलायची तिला. आणि तीही मला. दादा दुबई मधे, त्यामुळे तो आणि मंजू पण वेगळेवेगळे. आता मागे पाहिल्यावर वाटतं किती खडतर होते ते दिवस आपल्या प्रत्येकासाठी.  मुन्ना राण्या, मोनू, काय आणि काय. घरात तुझी किलबिल नसेल तर ते घर कसं होईल म्हणायचे बाबा. तेव्हा तुम्हा तिघांशिवाय हे घर
असू शकेल याची कल्पनाही नव्हती केली मी.
खूप मेहनत घ्यावी लागते आहे स्वतःवर तुम्हा तिघांशिवाय जगताना...

सण तर प्रचंड घालमेल करतात मनाची.आपण सण किती उत्साहाने साजरे करायचो. प्रत्येक सणावर एक लेख होईल इतके भरगच्च असायचे सण. आणि हो दिमाखात असायचे पण पैशाच्या नाही तर माणसांच्या .  गणपती, नवरात्र दसरा नुसती धमाल. सगळे जण आपापल्या परीने कामाला लागायचे. कोजागिरी जवळ आली की हमखास हुरहूर लागते माझ्या मनाला. आपल्याकडे वाढदिवस साजरा करत नाहीत म्हणून कोजागिरीच्या निमित्ताने चमचमीत खायला काहीतरी आणि  मसाला दूध करून सगळे एकत्र बसून प्यायचो. नंतर काणेकरांच्या घरी संगीत रजनीला जायचो. तुम्ही सांगायचा की घरी झोपा तुम्हाला झोप येईल पण तो लाईव्ह संगीताचा आवाज ऐकायला तेव्हाही आवडायचा म्हणून यायचो, मग झोप यायची मग बाबा घरी आणून सोडायचे. पुढे पुण्यात मस्त मित्रमंडळ जमवून मिसळ किंवा पावभाजी , पुलाव मसाले दूध करून रात्रभर गाणी म्हणत जागवायचो. सकाळी उठून सगळे आपापल्या कामावर. इतक्या असंख्य कोजागिरी  डोळ्यासमोर येतात अशा. आणि अशा दिवशी आपला वाढदिवस इतक्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होतो या कल्पनेने कोजागिरी  पौर्णिमेला माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. अलीकडे काही वर्ष एक मित्र परिवार जमून गाणी म्हणत नसू तर ऐकत छान साजरी करतो कोजागिरी. नाहीतर भारताबाहेर आल्यापासून  या  सर्वाला पारखं झाल्यासारखं  वाटायच.  माझ्या मनातली कोजागिरी कशी सापडणार मला इथे. माझ्या शिवाय कोणाला माहीत पण नव्हतं की मी काय शोधतेय त्या दिवशी किंबहुना त्या रात्री.  सगळे जमलोय,निखळ दंगा चालू आहे,  चविष्ट खादाडी चालू आहे, कोणीतरी मधेच गाणं म्हणायला चालू करतय, कोण तबला काढताय, पराग गिटार ची अप्रतिम साथ देतोय, श्रुती, श्वेता नृत्य करताहेत... अहाहा... एकातून एक गाणं सुचून कधी पहाट होतेय कळत पण नाही. आता कुठे तासभर झोपणार चला सकाळची गाणी म्हणू असं करत अंघोळ करायच्या वेळेपर्यंत गाण्याचा यज्ञ चालायचा. या रात्रीची आठवण काढत अख्ख वर्ष जायचं आणि दसरा झाला की  मंडळी पुढची कोजागिरीच्या तयारीला लागायची. काही मंडळी गळायची, काही नवीन यायची पण कोजागिरी साजरी व्हायची. वयामुळे असेल पण तेव्हा जागरण म्हणजे अस्स करायचो. आता जमलं असतं का?  आता वाटतं मी पुण्यात असते आणि दादा असता तर केली असती  कोजागिरी तशीच साजरी... आम्ही दोघेही भावंडं असल्या मजेला नेहमीच एका पायावर तयार म्हणा. आतातर अनिल, सानु, ईशान हे नव्या दमाचे कलाकार पण आहेत.काय रंगली असती कोजागिरी...मुख्य माणूसच नाही ना पण...उत्साह मूर्ती माझी.

 दुसरी उत्साह मूर्ती तर केवळ अशक्य..... तीही अशीच अचानक निघून गेली या जगातून.. ऑफिसमधे तुफान काम असू देत  त्याच्यावर पण नंदन दादा थकला आहे आणि त्याला दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळ करायला यायला उशीर झालाय हे शक्य च नाही... पटापट पायऱ्या चढत, एखादं सुंदर गाणं म्हणत स्वारी घरात शिरणार. एक एक करत सगळे हजर vhyache, २०-२५ जण असायचो. गणपती मंदिरात सर्वांनी मिळून घेतलेलं दर्शन, घरी येऊन आईच्या हातचे खमंग फोडणीचे बांद्याचे लाल पोहे, गुळपोहे, दहीपोहे, आणि सर्वांचा फराळ असा थाट असायचा. पुष्पा ताईच्या चकल्या खात खात त्यावर काहीतरी विनोद चालू असायचे. आई आम्हा सर्वांना त्या दिवशी ओवाळायची ... खूप भारी वाटायचं मला ती ज्योत आपल्यासमोर ओवाळलेली पाहून. इतकं पोट भरायच की सगळे म्हणायचे आता काही जेवण वगेरे नको. काहीतरी थट्टा मस्करी सुरू असायची. एवढ्यात कुठेतरी जाऊया अशी टूम निघायची. १०-१२ दुचाक्या निघायच्या. भटकत भटकत शेवटी स्वारी भोज्याला पोचायची म्हणजे एखाद्या हॉटेलात. अवधूत काका आणि ज्योत्स्ना ताई बँकेच्या दिवाळी बोनस चा भाग आमच्या त्या वेळेच्या पार्टी वर खर्चायचे. तिथून भरपेट खाऊन तृप्त होऊन सगळे पुन्हा घरी यायचो. चक्क सगळे बाहेरच्या खोलीत जमेल तिथे आडवे व्हायचो... ज्येष्ठ मंडळी डुलकी काढीत पण आमची कुजबुज चालू असे. थोड्या वेळात चहा टाका घरी लक्ष्मीपूजन करायला जायचंय अशी मागणी करण्यात यायची. चहा पिऊन या अशक्य सुंदर मैफिलीची सांगता व्हायची.
आधी बांद्यात असताना तिथेही खूप धमाल केली दिवाळीला. खूप माणसं आणि त्यातून आम्ही सगळी मुलं एकत्र दंगा घालायचो नुसता. मला सांगा इतक्या माणसात दिवाळी साजरी करायची सवय असणाऱ्या मला इथे लंडन मधे माणसं जमा केल्याशिवाय कसं करमेल...पण विकांत नसेल तर कुठून येणार माणसं? .इथले सगळे सण शनिवार रविवारी साजरे होतात. इथेही जीवाभावाची मित्र मंडळी आहेत,  जमतो एकत्र खातो पितो. मजा असते...
.पण या मनातल्या दिवाळीचं काय?  प्रत्यक्षात नाही होत आता तशी साजरी  अशी तडजोड तर केलीय मनाशी... पण ही आठवणीतील दिवाळी कायम असते माझ्यासोबत,  तशीच्या तशी.

 आणि तुम्ही, सर्व सोडून गेलेली मंडळी...आता वर जोरात दिवाळी करत असाल ना... तिथेच उपस्थिती जास्त आहे आता या कंपुतली...
तुमच्या शिवाय जगताना होणारी आमची तारांबळ पाहून छान करमणूक होत असेल नाही? आम्हाला पडलाय तसा तुम्हालाही पडतोय का हा प्रश्न ? जिएं तो जिएं कैसे बिन आपके?

No comments: