Saturday, April 4, 2020

सूर सखा



ऑगस्ट 2018. आई UK madhe होती माझ्याकडे. आजारी होती, हॉस्पिटल ला तपासण्या चालू होत्या. 80% कळलं होतं की रक्ताचा कर्करोग आहे. अशावेळी हॉस्पिटल मधे जाता येता होणारे गाडीतले प्रवास anxiety वाढवणारे असायचे.पण हे  प्रवास सुसह्य केले राहुलच्या गाण्याने.  त्याच काळात Rahul Deshpande tyacha audio blog karayacha. Mi कायमच सगळे भाग ऐकायची पण विशेषतः तेव्हा आलेला गुरुजी भाग 3 ने मला वेड लावलं होतं. त्यातला सुरवातीलाच गायलेला रागेश्री मधला तराणा .. अहाहा काय तो आवाज, भेदक सूर, सुरेल ताना आणि त्यातून तो तराना त्यामुळे अधिकच आवडला. राही रागाची सुरावट सुधा अप्रतिम. तर मी प्रत्येक वेळी जाता येता हा ब्लॉग गाडीत लावायची. हॉस्पिटलला जाऊन काय ऐकायला मिळणारे, किती वेळा आईला सुया खुपसून घ्यायला लागणारेत, येताना आलेली भकासता, उद्विग्नता, खिन्नता सगळी मी आणि आईने या गाण्याच्या जीवावर पेलली. हेच लावून कधी गाडीत ढसढसा रडलो तर कधी धीराने सामोरे गेलो. संगीताची ताकद. त्यातून कलाकार  इतका तयारीचा असल्यावर काय हवं. राहुल, माझ्या आयुष्यातल्या अशा अनेक आव्हानांना सामोरं जाताना तुझं गाणं बरोबर असतं आणि ते हा प्रवास कधी सुसह्य, सुखकर, अविस्मरणीय तर कधी आनंददायी करतं.  जसा माझा नवरा, माझे नातेवाईक,मित्रमैत्रिणी माझ्या बरोबर माझ्या प्रसंगात असतात तसाच आधार आणि सहभाग तुझ्या गाण्याचा असतो तुझ्या आत भिडणाऱ्या आवाजाचा असतो. तुझ्या या योगदानासाठी मनापासून धन्यवाद आणि त्यासाठीच हा लेखप्रपंच.

साधारण 2000-2001 सालची गोष्ट असेल. झी मराठी वर सूर ताल नावाचा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम लागायचा. बाबा आजारी असायचे पण रोज सकाळी आणि संध्याकाळी न चुकता दोन्ही वेळचा कार्यक्रम पाहायचे. बऱ्याचदा संध्याकाळचा रिपीट telecast असे. आजचे प्रस्थापित मराठी गायक गायिका तेव्हाचे उभरते कलाकार होते आणि त्यांच्यासाठी हा एक चांगला मंच होता. एक दिवस सकाळी कॉलेजला जाण्यासाठी आवरता आवरता एक  किंचित अनुनासिक पण थेट काळजाला भिडणारा आवाज ऐकू आला...एक मुलगा वसंतरावांचे गाणं गात होता. पळत येऊन पाहिलं तर बाबा म्हणाले हा राहुल देशपांडे, वसंतरावांचा नातू. अजुन विशी सुधा पूर्ण न केलेला हा उमदा युवक.
त्याचं गाणं, त्याचा आवाज, हातवारे, गाताना मधेच नाजूक हसणं सगळच फार भावलं. त्याचं गाणं सूर ताल मधे लागताच असेन तिथून धावत येऊन ऐकू आणि पाहू लागले.

सवाई गंधर्व पाहायला गेलं की मी तबलजी आणि त्यांच्या "अदा"   यावर किती जीव टाकायचे घरातल्या सर्वांना माहीत होतं. पण आता एखाद्या गायकासाठी, त्याचं गाणं ऐकायला आणि तो तल्लीन होऊन गाताना ते पाहायला मी तशीच वेडी होत होते. आई बाबा वसंतरावांच्या गाण्याचे निस्सीम चाहते त्यामुळे त्यांची गाणी लहानपणापासून कानावर पडलेली , ती आता राहुल गात होता. जाम आवडत होता आम्हा सर्वानाच. माझ्यासाठी सचिन तेंडुलकर ला सॉलिड competition  आली होती. सचिन ची मॅच आणि राहुलचं गाणं मी चुकवत नव्हते.

बाबानाही राहुलचं गाणं भारी आवडायचं.  म्हणायचे राहुल ने आजोबांची गाणी जरूर गावीत पण त्यात अडकून पडता नये. गळा अजुन तयार करून सुसाट सुटला पाहिजे. आजोबांची  गाणी स्वतःच्या शैलीत गायला हवी त्याने. अर्थातच राहुल पण तयारी करत होता. त्याला पुलं सारखे आजोबा, बापू काका सारखे कानसेन वडील, तज्ञ आई आणि एकाहून एक तरबेज गुरू होतेच की. प्रत्येक पुढचा कार्यक्रम पहिल्यापेक्षा सरस होत होता. आजोबांच्या शैलीचा हात धरून वर आलेला राहुल  हळूहळू स्वतःची शैली, ठसा उमटवत होता.  माझंही वेड वाढतच होतं. मी ही गाणं शिकत होते माझ्या आईकडे. बगळ्यांची माळ फुले तेव्हा डोक्यावर सवार होतं. ते गायचा पुरेपूर प्रयत्न चालू होता माझा. गळ्यातून उमटत नसली तरी त्या गीताची प्रत्येक जागा, प्रत्येक सूर कानात होता. इतक्या वेळा ते गाणं म्हणायचे मी, आई पेटीला आणि मिलिंद तबला घ्यायचा वाजवायला, माझी वहिनी मंजु,  ईशान chya वेळेला प्रेग्नंट होती तेव्हा. ती म्हणू लागली माझं बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा रडण्या ऐवजी नक्की बगळ्यांची माळ फुले म्हणणार😁 सांगायचं असं की एवढं राहुलच्या आवाजाने त्याच्या गाण्याने माझ्यावर गारूड केलं होतं.

पुढे मी UK ला आले आणि संगीताच्या लाईव्ह कार्यक्रमांना पारखी झाले. पुण्यातली ही हिरवळ मात्र जगात कुठे सापडेल असं वाटत नाही. आठवड्याला एखादा संगीताचा कार्यक्रम पाहणारी/ ऐकणारी मी आता वर्षभरात एखादा पाहू लागले.तेव्हाच राहुलची काही गाणी ऑनलाईन सापडली. पण ऑडियो.अजुन YouTube yet hota. त्यात मारूबिहाग मधली चीज होती, " मै पतिया लिख भेजू". अहाहा काय सुरेख म्हणाली होती राहुल ने. याड लावलं मला तिने. दादाला पण ऐकवली, पाठवली तो पण येडा मग त्याचा😃

एक दोन वर्षात भारतवारी मधे कट्यार पहायची संधी मिळाली. जाम आवडला नाटक.एकदा बघुन समाधान होईना पण नाही मिळालं पुनः पाहायला. राहुल च गाणं तर आवडतं पण अभिनय जमेल का.. असं वाटणाऱ्या सर्वांना त्याचं काम नाटक गाणं सर्व काही आवडलं.  राहुलचं प्रयोगशील असणं जबरी भावलं मला. खरं पहायला गेलं तर ती जोखीम होती त्याच्या गाण्याच्या करियर वरती घेतलेली पण ती त्याने उचलली आणि यशस्वीरीत्या पार पाडली. चुका होणं साहजिक पण त्या सुधारण्यासाठी परिश्रम घेत राहणं हे त्या पुन्हा न होण्यासाठी प्रचंड महत्वाचं. राहुल ने नेमकं हे पकडलं. चुका होण्याच्या, अपयशाच्या भीतीने प्रयोगशीलता नाही मारली. एखाद्या उभरत्या कलाकारासाठी धाडसी पायरी असणारे ती.  कसोटी लागली असेल पण अशाच वेळेला स्वतच्या कौशल्यावर आणि मेहनतीवर पाय रोवून उभा राहू शकला तो राहुल.

 आज त्याचा गळा, त्याचा सूर वयाप्रमाणे प्रगल्भ होतोय हे स्पष्ट जाणवत. सतत काहीतरी नवीन सुचत , दिसतं ते प्रयोग करत असतो , काहीवेळा डोक्यात सुचलेल्या विचाराला गळा साथ देत नाही असं प्रांजळपणे कबुल करतो. पण दुसऱ्या क्षणी विजेसारखा कडाडतो. कधी नाजूक लयदार तान तर कधी बरसणारा मेघ.आत खोलवर पोचणारा सूर. जीवघेणी सुरावट आणि त्यात प्रसन्न मुद्रा घेऊन गाणारा राहुल.   नरसोबाची वाडी ला जेवणारे भटजी जसे मांडी घालून दोन्ही पायांच्या पुढे मधोमध डावा हात पालथा ठेवून उजव्या हाताने श्रीखंड चोपतात, तशी एक लकब आहे राहुलची. तसाच बसून दोन्ही हात पुढे पालथे घालून खांदे उचलून ठेवणीतल्या पल्लेदार ताना घेत असतो.  गाण्यातील एखादी नाजूक जागा घेताना उजवा  डोळा बारीक मीचकावतो, हातांची दोन बोटं पुढे नेत त्या लकेरीतील नजाकत उलगडून दाखवतो आहे असं वाटतं. ओयेहोये क्या बात है.. दिलं खुश हो गया तर अलिकडच कैवल्यागान ऐकुन कातर होतं मन. कुमार गंधर्व यांची अजरामर केलेली निर्गुणी भजनं, गझल, भजन, नाट्यसंगीत, अभंग, भावगीत असे सुगम संगीताचे अनेक प्रकार तो आवडीने ताकदीने गातो. जुन्या संगीत नाटकांना पुन्हा रंगमंचावर आणून तरुण पिढीला आपल्या संगीताची झलक दिली.   वसंतोत्सव सारखा गाण्याचा उत्सव सुरू केला.सर्वांना विनामूल्य प्रवेशिका असतात.  मला ही गोष्ट फार आवडली. त्याला कारण असं की शास्त्रीय/अभिजात  संगीत हे पैसेवाल्या लोकांनाच उपलब्ध आहे असं नाही तर संगीताचा खरा चाहता ते ऐकू शकला पाहिजे. भारतीय संगीताचा प्रसार करण्यामध्ये याचा वाटा नक्कीच मोठा ठरेल असं आपलं मला वाटतं. मी जेव्हा पुण्यात शिकत होते तेव्हा कितीही वाटलं तरी सवाई किंवा इतर मोठ्या कार्यक्रमाची तिकीट आम्हाला परावडायची नाहीत, कोणी आतून मानाचे फुकट पास मिळालेली लोकं बाहेर आली की आम्ही ते पास मागून आत जाऊन उरलेला कार्यक्रम पहायचो. जगजीत सिंग यांचा एक  गणेश कला क्रीडा मधला कार्यक्रम तर अख्खा बाहेर गाडीवर बसून ऐकला आम्ही सर्वांनी. आत जायला तेव्हाच ५०० रुपये तिकीट.  त्या धर्तीवर मला हा राहुलचा उपक्रम स्तुत्य वाटला. त्यातून गाण्याचे कार्यक्रम त्याने फक्त पुण्यापर्यंत मर्यादित न ठेवता नाशिक, सातारा, कोल्हापूर येथे वसंतोत्सव करून पोचवले.
साताऱ्याच्या वसंतोत्सवातील गाणी YouTube var tyachya channel var आहेत.
 अतिशय अप्रतिम आणि तयारीच गायला आहे त्यात राहुल. अमर ओकची बासरी, आदित्य ओक ची हार्मोनियम ची साथ सहज सुंदर. पण मोहक आहे ती सरोद वादनाची साथ. कलाकार मला माहितीचा नाहीये. राहुलच्या गाण्यात मधेच सरोदचे सूर गाण्याला अशक्य उंचीवर नेतात.  असं कौशिकीच्या एका मैफिलीत अनुभवलं होतं. राहुलची मैफिल तशी पाहून ही टॉप फॅन एकदम खुश.

सध्या फेसबुक लाईव्ह मुळे राहुल बऱ्याचदा दिसतो, त्याचं गाणं virtually live aiku शकतो हेही नसे थोडके.

राहुलला मिळालेली आवाजाची देणगी, त्यावर घेतलेली अपरिमित मेहनत, गाण्यातला, सुरातला आणि विचारातला सच्चेपणा त्याची कारकीर्द यशस्वी आणि झळाळती करेल यात शंका नाही. पण याच सर्व गोष्टी त्याला ऐहिक सुख, कीर्ती यांच्या पलिकडे जाऊन संगीतातून मिळणारा परमोच्च आनंद ही मिळवून देतील.
आमच्या सारख्या असंख्य लोकांना त्याच्या या कलेने आनंद, उमेद अशीच सतत मिळत राहो🙏

राहुलचा YouTube channel://www.youtube.com/channel/UCD-gpX6FMfs3M4mhLsz8Wkw

Listen to Audioblog 21 (Season 2) Guruji Part 3 by Rahul Deshpande on #SoundCloud

अदिती हिरणवार

No comments: