Thursday, June 4, 2020

कौशिकी : लोभस दृक श्राव्य अनुभूती


७-८ वर्षांपूर्वींच्या आमच्या भारतवारीतील एक गेट टुगेदरला एक मित्र बराच उशिरा आला, विचारल्यावर मिळालेल्या उत्तराने बाकी काही विचारणा किंवा उशिरा आल्यामुळे रुसण  शक्यच नव्हतं.  तो म्हणे, "काय सांगू ....मी एका शास्त्रीय संगीत सभेत द्रुकश्राव्य अनुभवात नाहून निघालोय ", असा इतका सुरेल आणि देखणा कार्यक्रम कुणाचा असेल असा प्रश्न पडलाय का?  तर तो होता अभिजात संगीतातील तेव्हा उभरत्या असलेल्या पण आताच्या नामांकित गायिकेचा ... कौशिकी चक्रवर्ती. या नावाने तो प्रसन्न चेहरा, ते विलोभनीय हास्य आणि स्वर्गीय सूर न आठवलेला विरळाच.

गेले बरेच महिने या नावाने आणि तिच्या आवाजाने गारुड केलंय माझ्यावर. उठता बसता तिचं गाणं ऐकते. आरस्पानी, अस्मानी सौंदर्य , गोड गळा , तो अतिशय सुरेल आणि गायनासाठी लवचिक, सशक्त करण्यासाठी घेतलेले अमाप कष्ट. सरगम वरची अफलातून पकड, कधी नाजूक हळवी तर कधी सूर झंकार करत तीन सप्तकात लीलया विहार करणारी तान . 
आवाजाची तुफान रेंज, पण चेहऱ्यावर किती साधे भाव. सुंदर आहोत हे माहित असून त्याचा बारीकसाही अभिनिवेश वावरण्यात नसणे याने तिचं ते सौंदर्य कमालीचं खुलतं. कोणताही कलाकार त्याचा कलाविष्कार साकारताना असलेल्या तल्लीन स्थितीत अतिशय मनस्वी भासतो. कला सादर करताना कलाकाराची आभा हा माझा एक वेगळा जिव्हाळ्याचा विषय आहे .रोजच्या जीवनात अतिशय सामान्य भासणारी व्यक्ती कलाविष्कार सादर करताना ओजस्वी भासते.. पण कौशिकी बद्दल माझा असा समज आहे की ती रोजच्या जीवनातही तितकीच असामान्य भासत असावी जितकी गाताना..निसर्गदत्त सौंदर्याचं लेणं अतिशय सहजतेने पेलणारी ही स्वरमोहिनी, जिथे सौंदर्य, कला, बुद्धिमत्ता, विनय, कर्तृत्व, अथक परिश्रम सगळंच एकत्र सुखात नांदतंय.  तिची कला आणि तिच्याशी अशक्य प्रामाणिक असलेली कौशिकी, हेवा वाटण्याएवढी भावते मनाला. 

लहानपानापासून घेतलेली मेहनत, तासनतास केलेल्या रियाजातून आत्मसात केलेले स्वर आणि पलटे , त्यावरची तिची पकड अफलातून. "याद पिया कि आये " गाताना  कधीतरी गमतीने कोयलिया कुहू कुहू म्हणताना खरंच कुहू कुहू  असा आवाज काढला तर आता श्रोते ती बंदिश आणि ती जागा घेतली नाही तर बैठक अपुरी मानतात . त्यावर ती थोडी  नाराजीही व्यक्त करते. एकाच गोष्टीने ओळखल जाऊ नये, हा तर माझ्या खजान्यातला एक छोटासा स्वर नजराणा आहे असं जणू काही तिला सांगायचंय . 

मी सतत रियाझ करते पण खास अशी मैफिलीची तयारी करत नाही असं ती सांगते . जे उमटतंय ते उमटू देत. गाणं मी गात नाही तर ते माझ्या आतून येतं .जसं वाद्यांच्या माध्यमातून उमटलेल्या  स्वरांनी  संगीत आपल्या पर्यंत पोचतं  तसंच  ते तिच्या  स्वरयंत्राच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोचतं असं  तिच म्हणणं आहे. किती ते जमिनीवर असणं! मैफिलीसाठी मंचावर बसल्यावर सर्व तयारी झाल्यावर अगदी गाणं सुरु व्हायच्या आधी एक क्षण येतो तेव्हापासून ते गाणं  संपेपर्यंत  जे काही असतं  त्यात कौशिकी नसते तर आधी केलेल्या गाण्याच्या तयारीतून आणि गळ्यातून घडणारी दैवी  किमया असते असं  ती मानते. 

you tube  वर गायनाचे खूप व्हिडिओज  आहेत तिचे.  एका गायन सभे मध्ये भैरवी रागातील विलंबित खयाल गायला आहे तिने. भैरवीने सांगीतिक बैठकांची सांगता होते त्यामुळे या रागात ख्याल  सहसा गायला जात नाही  बरीच दुर्मिळ गोष्ट तशी पण कौशिकीचे  गुरु, वडील आणि  तिचे आदर्श , पंडित अजय चक्रवर्ती यांनी हा गायला आहे असं  ती सांगते.  भैरवीतला ख्याल गायचा पहिलाच प्रसंग आहे त्यामुळे चूक असेल ती माझी पण काही भावलच तर त्याचं  श्रेय माझ्या बाबांना अशी सुरुवात करते ती. केवळ विनय म्हणून ती असे म्हणते आहे असं वाटण्या एवढा तो लाजवाब वाठवाला आहे तिने हा पहिला प्रयत्न.
 तसा भैरवी हा गान सभेच्या शेवटी गायला जाणारा हा धीर गंभीर राग. माझा लहानपणा पासून अतिशय आवडता. अगदी लहान असताना आई बरोबर कुठे तरी मैफिलीला गेल्यावर खूप वेगळ्या कारणांसाठी आवडायचा . कळलं होतं कि भैरवी म्हणली कि मैफिल संपते आणि बाहेर येता येतं . त्यामुळे  तो ओळखता  येऊ लागण्या आधीच्या काळात कोणीही काहीही गाऊ लागलं की ही भैरवी असेल तर बरं होईल😁 असं हमखास मनात येई. मोठेपणी तोच राग अतिशय हुरहूर लावतो..त्यातील बंदिश, भजन यातले बोल आणि रागातले स्वर तसेही कातर करणारे असतात म्हणून असेल कदाचित.

पंडित अजय चक्रवर्ती यांच्या श्रुती नंदन या संगीत शाळेविषयी मला वाटणारा आदर, जिव्हाळा कौशिकी मुळे दुगणा होतो. अजयजीनी जी मेहनत मुलीकडून करवून घेतली तशीच ते इतर मुला मुलींकडून करवून घेतात. सतत,अविरत कला शिक्षण देणारी अशी संस्था असणं आणि त्यातून कौशिकी सारखे कलाकार आपल्याला मिळणं हे भाग्यच आपलं.

कौशिकीच गाणं अजुन लाईव्ह नाही ऐकता आलंय ही खंत आहे. पण खूप खूप व्हिडिओज आहेत इंटरनेट वर. त्यातला मी कितीही वेळा पाहू शकेन असा व्हिडिओ म्हणजे तिची शंकर महादेवन यांनी घेतलेली मुलाखत. किती ताकदीची माणसं हो दोन्ही. या कार्यक्रमाने तर मी तिची सतत हलणारा पंखा झालेय. नक्की नक्की सर्वांनी पहावा असा आहे हा कार्यक्रम. 
त्यातच ती सखी या तिच्या ६ स्री  कलाकारांनी  एकत्र येऊन उभारलेल्या बँड  विषयी बोलते. त्यातील कंजली नावाचा गान प्रकार गाऊन दाखवला आहे तिने. ती ठुमरी आहे जी तिने अर्पण केली आहे पूर्वी तवायफ असायच्या त्यांना. कारण ठुमरी ही त्यांची देन आहे. आणि त्यांच्या व्यवसायाच्या पार्श्वभूमी मुळे त्यांच्यातील कलाकार आणि स्त्रीत्व नेहमीच उपेक्षित राहिलं आहे. त्या सख्यांना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या  band  मधे ही कंजली आवर्जून गायली जाते. किती विचार आहे ना यात सुधा? ज्याचा मान त्याला दिला गेला पाहिजे..

अजुन एक नक्की ऐका, भैरवी तील भजन ही म्हणते ती एक" तुम आ जाना भगवान"... त्याला एका मैफिलीत सरोद ची साथ आहे... जन्नत अनुभव आहे.

आपण जसे आता अनेक दिग्गज कलाकार ऐकतो , आपली वडील धारी म्हणतात की अरे हे आमच्या वेळचे... तेव्हा वाटायचं अरे आपण आधी का नाही आलो जन्माला , कुमारजी, वसंतराव वगैर लाईव्ह ऐकायला मिळाले असते. 
आता वाटतं तेव्हा नसू पण कौशिकीची कारकीर्द चालू असताना आपण कानसेन आहोत हे काय कमी आहे. पुढच्या पिढीला आधी जन्माला यायला हवे होतो असा विचार नक्कीच येईल  नंतर कौशिकी ला गाताना ऐकुन, पाहून.

हो त्या आधी मात्र मला लवकरच त्या लाईव्ह दृक श्राव्य अनुभवात बुडून जायचं आहे... किमान एकदा तरी🙏

अदिती हिरणवार

No comments: