Tuesday, May 19, 2020

राघवशेला



कोरोना मुळे जगभरात पसरलेल्या एक भीतीच्या सावटाखाली आपण सारे सध्या जगतो आहोत. जोपर्यंत त्यासाठीची  प्रतिबंधात्मक लस, किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास हमखास लागू पडणारे औषध सापडत नाही तोपर्यंत तरी हे संकट असेच जगाला जायबंदी करत राहील असं एकुणात दिसतंय. ही परिस्थिती बदलण्यासाठी कोणत्याच देशाकडे सामाजिक अंतर  पाळण्या व्यतिरिक्त काही ठोस उपाय दिसत नाहीयेत. सगळी सरकार स्वतच्या परीने यावर तोडगे काढायचा प्रयत्न करताहेत. त्यांची त्रेधतिरपीट उडते आहे हे नक्कीच. एरवी प्रेरणादायी, उदबोधक ठरणारी बऱ्याच राजकारण्यांची भाषणं प्रभावी होत नाहीयेत. भविष्याच्या चिंतेने किंवा सद्य परिस्थितीत असलेल्या आव्हानामुळे  आपण थोडे का होईना भयभीत होतोच आहोत. पुढे काय, कसं आणि कधी हे प्रश्न सध्या कोणालाच उमगत नाहीयेत. आणि हे प्रश्न n पडायला आपण लहान पण नाही राहिलो आता.

लहान असतो ना तेव्हा वाटत असतं काही झालं तरी आई बाबा आहेत तोपर्यंत आपण सुरक्षित. आई बाबा सुद्धा परिस्थिती पुढे हतबल होऊ शकतात याची सुतराम कल्पना नसते. बाबांनी दिलेला शब्दिक आधार, कधी आईने स्वतः पुढे होऊन सोडवलेले त्यावेळी बिकट वाटणारे प्रश्न याने वाटत असतं की आई बाबा सगळं बघून घेतील. माझ्या आवाक्याबाहेरचे सगळे प्रश्न सोडवायला हे दोघे आहेत ना मग कसली काळजी ..तत्पर्याने तुमचा राघवशेला तुमच्या बरोबर असतो तोही सगुण रुपात.  ग्रेस म्हणतात ना "सीतेच्या वन वासातील जणू अंगी राघव शेला" अगदी तसा.

हळूहळू मोठे होतो, परिस्थिती, प्रसंग बदलतात. एखादा प्रसंग असा येतो की वडीलधाऱ्या मंडळींना पण परिस्थिती समोर हतबल झालेले बघतो आपण...
 बाबांच्या चार वर्षांच्या प्रदीर्घ आजारपणात कित्येक वेळा मी तो क्षण अनुभवला. तीव्र वेदनेने व्याकुळ त्यांचा चेहरा,  हा आजार कमी न होता वेगवेगळी भयानक वळणं घेणार आणि अखेर त्यांच्या सोबतच संपणार हे  त्यांनी स्वतः सांगितल्यावर पायाखालची जमीन सरकली होती... पुढचा प्रत्येक दिवस अनेक हतबल प्रसंग अनुभवत गेला. भय इथले संपत नाही हे मनोमन पटलं तेव्हा. एका सगुण शक्तीचा (बाबा) आधार घेत पुढे बिनधास्त चालणारी मी अशक्य डळमळले.  कोणताही माणूस परिस्थिती पुढे अगतिक होऊ शकतो या अनुभवाने आतून बाहेरून हादरले होते. निर्गुणाची ओळख अजुन व्हायची होती. त्या निराकार शक्तीवर अजुन विश्वास नव्हता. मग एखाद्या  भयावह प्रसंगातून जाताना आंतरिक ताकद देणारा तो राघवशेला कुठे होता साथीला.

हळूहळू बाबांच्या आठवणी ताकद बनू लागल्या. जगरहाटी चालू ठेवणाऱ्या त्या अज्ञात शक्तीवर विश्वास बसू लागला, त्यानंतर जी वेळोवेळी माझा राघवशेला बनते. ती अज्ञात शक्ती आपल्या समोर असलेलं आव्हान बदलत नसते तर आपल्याला त्याला सामोरं जाण्यासाठी सशक्त, समर्थ बनवत असते. आव्हानं साखळीने येत राहिली त्यामुळे याचा प्रत्यय अनेकदा आला.

हे सर्व पुन्हा प्रकर्षाने जाणवलं कोरोना मुळे. अवघं जग हतब ल आहे सध्या. हे केलं तर असं होईल का, मुलाची शाळा तर सुरू होते पण पाठवून काही चूक करत नाही ना आपण, एक ना दोन... ढीगभर शंका कुशंका...अशा भीतीच्या परिस्थितीतून चिकाटीने पुढे जाताना  आपल्या मनातला एखादा राघवशेला हा दुर्गम प्रवास थोडा सुगम करेल असं वाटतं.  राघवशेला जो प्रत्येकाचा वेगळा असेल. अगदी काहीही असू शकेल. पण सर्वात महत्वाचं आपण निष्ठेने त्याच्या साथीने मार्गक्रमण करत राहणं. सीतेने राघवाच्या शेल्याच्या  ( खरंतर हनुमानाने दिलेल्या अंगठीच्या) आधाराने रावणाच्या कैदेतील दिवस कंठले.  आपण आपल्या मनातील राघवशेल्याच्या आधाराने lockdown आणि त्यानंतरचा काळ व्यतीत करू शकू ना?

अदिती हिरणवार

No comments: