Friday, September 20, 2019

आई - जीवन प्रवाह

रामनवमीच्या पूर्व संध्येला बांद्यात आईला श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित केला आहे . त्यानिमि त्ताने दादाच्या मित्राने आईबद्दल लिहून पाठवायला सांगितलं होतं.

खरं  सांगायचं  तर आईच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाबद्दल आणि अनुभवसंपन्न आयुष्याबद्दल  थोडक्यात लिहिणं खूप अवघड आहे .  प्रयत्न करते.
आई मूळची सांगलीची . लहानपण अतिशय खडतर गेलं . आईची आई , आई खूप लहान असताना गेली. सावत्र आईने भरपूर छळ केला . वडिलांचं  घराकडे फार लक्ष नव्हतं . एकूण सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तिने औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला नर्सिंग कोर्सला ऍडमिशन  घेतली . ३. ५ वर्षे शिक्षणासोबत हॉस्पीटल मध्ये   वेगवेगळ्या वॉर्ड्समध्ये  ड्युटीवर असताना पेशंट्सची मनोभावे सेवा केली .  परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण  झाली.  नोव्हेंबर १९६७ मध्ये माझी आई कुसुम कानिटकर ची  सौ . मोहिनी गोडबोले  उर्फ  मामी बनून बांद्यात आली.
 सासू सासरे,त्यांची आजारपणं ,पुतण्या , पुतणी, असंख्य  पाहुणे त्यांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालणे यात तिचा बराच वेळ  जायचा.पण ते तिने मनापासून केलं .  तेव्हाचं  बांदा खूप वेगळं  होतं. आईला खेड्याची फारशी सवय नव्हती पण हळूहळू ती रुळत गेली.  बांद्यात बायकांनी बाजारात जायची प्रथा नव्हती .आईने प्रथमच  स्वतःला  घरात लागणारं  वाणसामान आणि भाजी स्वतः  खरेदी करायला  सुरुवात केली . जरा वेळ लागला पण बांद्याने  हा बदल स्वीकारला. आईने भजनी मंडळ  सुरु केलं . स्त्रियांना    छोटं  का होईना पण  स्वतः चं  असं एक विश्व असावं असा तिचा  आग्रह असायचा . घर, मुलं ,सासू सासरे सांभाळून तिने स्वतः  तिचं  छोटंसं  जग तयार केलं  होतं . माणसाला पूर्ण  क्षमतेने अखंड काम करण्यासाठी थोडासा विरंगुळा असणं गरजेचं  आहे असं  म्हणायची . पण तो विरंगुळा म्हणजे नुसती मजा नाही तर हातून सत्कर्म  घडत  राहायला हवं . आधी भजन नंतर बालवाडीत जाऊन मुलांना गाणी शिकवणे ,शाळेत परीक्षक म्हणून जाणे , मंगळागौर खेळणे असा बरच काही ती करायची.  नंतर तर प्रसूतिगृह . १००० च्या वर बाळं  जन्माला आली . प्रसूत झालेल्या स्त्रियांना योग्य तो आहार मिळतो कि नाही यावर तिचं  लक्ष असे. रात्री अपरात्री प्रसूती झाली तर चहा ,कण्हेरी वगैरे  आमच्या घरात बनवून बाळंतिणीला खाऊ  घातलं  जायचं .स्वच्छता , योग्य असा आहार , बाळाची निगा काटेकोरपणे राखली जायची. १० दिवस आईच्या प्रसूतिगृहात बाळंतीण माहेरपण अनुभवून जायची .  कित्येक मुलींना मी आईकडून घरी जाताना रडलेलं  पाहिलंय . स्वतःला आईचं  प्रेम मिळालेलं  नसताना , तिच्यात  एवढी माया,आईपण कुठून भरलं  होतं  देव जाणे . खूप लोकं  जोडली तिने तिच्या या स्वभावामुळे. अगदी शेवटच्या आजारपणात लंडन च्या हॉस्पिटलमध्ये असताना तिथल्या नर्सेस सुद्धा तिच्या प्रेमात होत्या. प्रत्येकीची आपुलकीने चौकशी करायची जेवणाखाण्याची , दमल्या भागल्याची. मग त्या पण अगदी आवर्जून आईची चौकशी करायच्या . भाषा , वर्ण,जात तिने कधी माणूसपणाच्या आड नाही येऊ दिल्या .

आईचं  आणि डॉ  खानोलकर यांचं  नातंही  अनोखं  होतं . तेही तिला धाकट्या  बहिणीप्रमाणे  प्रेम करत. त्यांनी एवढं  हक्काने  दुसया कोणाशीच वागताना मी पाहिलं  नव्हतं . आई बाबा यांच्यावर त्यांचा विशेष  जीव होता . माझे बाबा नेहमी म्हणायचे कि आईची मोलाची साथ मिळाली नसती तर त्यांना खानोलकर कटुंबासाठी जे काही करता आलं  ते नसतं  करता आलं . असे किती कंगोरे सांगू .

प्रसूतिगृह आणि क्लिनिक  मध्ये येणारे पेशंट्स सांभाळून तिने संगीत शिकायला सुरुवात केली. तिचे वडील उत्तम व्हायोलिन वादक होते, वारसाने आईला स्वरज्ञान होतं . बाबानी प्रचंड प्रोत्साहन आणि आईची कडी   मेहनत यामुळे  वयाच्या ५३ व्या  वर्षी ती उपांत्य विशारद झाली . त्याबरोबर  परसदारची  बाग तिने अतिशय मेहनतीने फुलवली होती . वांगी,मिरच्या , अळू ,काकडी , लाल भाजी असं  बरंच  काही ती पिकवायची. विविध फुलझाडं होती . आवडीने एक तरी फुल रोज डोक्यात माळायची .

बांद्यात महिलांचं  भजनी मंडळ उभारण्यातहि तिचा मोलाचा वाट होता. महिलां मधील संगीताच्या कलेला त्यामुळे उत्तम वाव मिळाला .  बांद्यातील महिला त्या निमित्ताने बाहेर पडू लागल्या.  आईला आणि महिलांना आयुष्यभराच्या जिवाभावाच्या सख्या  मिळाल्या .
१९९९ च्या शेवटी बाबांच्या आजारपणामुळे  तिला बांद्याचं  हे विश्व सोडून पुण्यात यावं लागलं.  बाग  नाही आता म्हणून वाईट वाटायचं तिला .  आता पुन्हा एकदा नवीन विश्व उभारायचं  होतं  तिला . पुण्यातही संगीताने जोरदार साथ दिली. दिवसभर घर, बाबांचं आजारपण  सांभाळून तिने संगीताचे क्लास  घ्यायला  सुरुवात केली . कोणतीही जाहिरात ना करता तिचे क्लास फुल  व्हायचे. भजनी मंडळात पेटीची साथ चालूच होती .  २००३ साली बाबा त्यांच्या किडनीच्या आजारपणाने गेले . आई त्यातूनही आम्हा मुलांसाठी हिमतीने उभी राहिली . मंदार, मंजू आणि ईशान यांच्या बरोबर सुखाने दिवस जात होते. २-३ वेळा लंडन ट्रिप झाली. लंडन मधेही तिला वेळ जायचा कधी प्रश्न नाही यायचा . मुलांच्या गाण्याच्या परीक्षेच्या वह्या लिहून काढायची , नवीन गाणी बसवणे, माझ्या मैत्रिणींच्या घरी जाऊन  त्यांना पाककलेचे धडे देणे अशा विविध गोष्टी करत राहायची.
२०११ डिसेम्बर मध्ये मात्र तिच्यावर फार मोठा आघात झाला. मंदारच्या जाण्याने  जगण्यातला आनंद हिरावला गेला . त्यातूनही  मंजू आणि ईशान साठी भक्कम उभी राहिली . आतून कितीही दुःखी  होती तरी त्यांना उभं  करायचं  म्हणून परिस्थितीवर मात करत राहिली.  मंजूचं  पुन्हा लग्न व्हावं  यासाठी प्रचंड झटत  होती .  ते जेव्हा झालं  तेव्हा ती प्रचंड खुश होती . स्वतःच्या म्हातारपणाला आधार हवा असा स्वार्थी विचार ना करता तिने मंजूच्या आयुष्याचा विचार केला  यातच तिच्या विचारांची प्रगल्भता कळून येते .
तिला शेवटी कॅन्सर सारखा गंभीर आजार झाला आणि त्यात तिला खूप यातना भोगाव्या  लागल्या पण तिने त्या तेवढ्याच  धीराने आणि संयमाने सहन केल्या . नशिबाने तिला अडचणी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दिल्या आणि आईने तितक्याच हिमतीने  त्यावर मात केली . असामान्य धीर आणि हळवं ,प्रेमळ  मन यांचा प्रचंड लोभस संगम तिच्या होता . जमा केलेली माणसं  हेच वैभव मानणाऱ्या आईच्या पोटी जन्माला  आलो हे भाग्य.


तिला तिची दैदिप्यमान कारकीर्द करायला बांद्याने उदंड सहकार्य केलं . त्यासाठी माझ्या कडून बांदेकरांना माझा मनापासून मुजरा !

🙏मोनाली

No comments: