Saturday, May 2, 2020

जीवनगाणे आनंदाने गाणारी आजी


( यमू आजी , आईची मावशी)

कित्येक वर्ष मला माहीतच नव्हतं की यमु आजी माझी खरी खरी आजी नाहीये म्हणजे आईची आई नाहीये. अजूनही आठवतं, खूप वाईट वाटलं होतं मला की का ही माझी सख्खी आजी नाहीये. सुट्टीला, लाड करून घ्यायला तर इथेच येतो , आई पण यालाच माहेर म्हणते मग अजुन काय असतं सख्खी आजी म्हणजे. आईची आई असायला लागतं हे लक्षात आलं नव्हतं. कारण आजी ने कधी हे जाणवू दिलं नव्हतं.
जसा सौरभ तसेच आम्ही दोघे असायचो सुट्टीला गेलो की. खूप दंगा करायचो म्हणून एकत्र शिक्षा असायची. आम्हाला शिक्षा केल्यावर ती कोणाला तरी का केलीय हे सांगतान आजीला गालातल्या गालात बारीक हसू फुटायच.
ते हसू अजुन लक्ख आठवतं. नानांनी आजीशी प्रेमविवाह केला तो या लाजवाब हास्यामुळेच असेल😍

थोडी मोठी होऊ लागले तशी आजी कळायला लागली. आईकडून तिची आधीचा जीवनपट कळाला होता आता स्वतः अनुभव घेत होते. बाबा आजीकडे कधीही जाऊन पोचले तरी हसतमुख स्वागत आणि मस्त तुपातला खमंग शिरा हे होणारच. दुखरी कंबर घेऊन , ओट्याचा आधार घेऊन उभी राहायची पण करू नको म्हणलं तर म्हणायची मोहनराव तुम्ही थोडीच रोज येताय... काही नाही होत एवढ्याश्या ने. किती लहान कृती होती पण मनावर कोरली गेली. संस्कार असेच घडत असतील बहुदा...
मी दहावीला असताना शकुमावशी आजारी पडली. पूर्णतः जागेवर होती ती. नानांच्या मदतीने आजी तिचे  सगळं जागेवर पण शिस्तीत करत असे. सहा बाळंतपणाने हल्लख झालेली कंबर घेऊन त्या वयात जागेवर असणाऱ्या मोठ्या मुलीची शुश्रुषा करणं सोपं नव्हतं. तिने तेही निकराने केलं. खूप आधीपासून अवगत होती तिला ही कला. स्वतःला त्रास होतोय तरी दुसऱ्या साठी करायचं कारण आपण नाही केलं तर तिला दुसरं कोण आहे. माझ्या आईची दोन्ही बाळंतपणं तिने अशीच केली. आईला दुसरं माहेरच नाही आणि तिची डॉक्टर सांगलीत. अण्णा आजोबांनी एकदाच आजीला म्हणलं की तिला येऊ देत तिला दुसरं कोण आहे..  असं म्हणाल्यावर आजीने आईला दोन्ही वेळेला सांगलीत घरी आणून तिची बाळंतपणं निगुतीने केली. दुसऱ्या वेळेला तर माझे आजी आजोबा ( बाबांचे आई बाबा)जे अतिशय म्हातारे होते आणि त्यांचं  माझ्या आईशिवाय कोण करणार म्हणून तेही म्हणे आजीच्या घरात एका खोलीत राहायला आले होते. हा तर कळस होता अण्णा आजोबा, नाना आणि आजीच्या चांगुलपणाचा. स्वतः पुरतं न बघता समोरच्याची अडचण समजून त्याला आधार देण्याची असामान्य कुवत. आणि हो ही कुवत मनाची लागते बाकी सर्व गोष्टी आपसूक मार्गी लागतात.

कुटुंबातील सर्वांचे हवे नको बघताना मनाला ताजं टवटवीत ठेवतो तो आपला आवडता असा एखादा विरंगुळा. विरंगुळा म्हणून चालू केलेलं कीर्तन आजीला किती बक्षीसं, सन्मान घेऊन आलं. जे करेल त्यात भराभर पुढे जाणं हे तिचं खास वैशिष्ट्य. थोडे थोडके अडथळे तर ती कधीच पर करून जात असे. भीड भाड ना बाळगता चार लोकांशी बोलून, अडचण सांगून त्यावर उपाय मिळवत राहायचं. रडत कुढत बसणे वगैरे तर माहीतच नसेल बहुदा. तिच्या वृद्धावस्थेत तिला वरच्या मजल्यावर काही दिवस राहावं लागलं. आधी थोडी वैतागली की आता कीर्तन बंद, गुडघे दुखतात तर खाली जाणार कसं म्हणून. पण पुन्हा भेटली तेव्हा जिन्यातच होती, मला वाटलं वर जातेय कारण तशी उभी होती पण नाही , उलट उतरलं की गुडघे दुखत नाहीत म्हणून उलटी उतरत होती कारण भजन कीर्तनाला जायचं होतं. असे हे उपाय शोधणे आणि आनंद मिळवणं.

दादा आणि मी पुण्यात दोघेच राहत होतो तिथे नाना आणि आजी आवर्जून राहायला आले होते. खूप मस्त वाटलं आम्हाला. मी स्वयंपाक करून वाढायची ते आवडीने खायचे. मी बाहेर गेलेली असताना दुधाच्या ऐवजी आजीने ताक घातलं चहात. नाना म्हणाले की अग चहा वेगळा लागतोय तू काय घातलं... तर म्हणे इथे जे काय होतं ते घातलं, जाऊ देत आता प्या आहे तसा. ... मी आल्यावर काय धमाल हसलो सगळे मिळून.त्यांच्या तरुणपणी तरकट असणारे नाना आता किती हसून सांगत होते हे सगळं. आजी नाना , भिन्न स्वभाव पण काय लोणचं मुरल होतं.किती सांभाळून राहत एकमेकांना . भांडणं वादावादी चालायची पण मधेच काहीतरी विनोद करून दोघेही हसायचे. आजीला आलेलं हसू ही एक अनुभवायची गोष्ट होती.. एका सुरात म्हणलेल त्यांचं करुणाष्टक कानात आहे अजुन, प्रसंगी हळवं करतं मला. त्यांचा आधार आत्ता असता तर असं वाटून.

बाबा गेल्याचं कळल्यावर आजी नाना राहायला आले होते. आईच्या बाजूला तेव्हाही आजी उभी होती. थकली होती शरीराने तशी. बसून बसून सर्वांना काय करायचे काय नाही याचं मार्गदर्शन करत असे.  तेव्हा मी तिला ओट्यापाशी खुर्ची देऊन, बाकी सगळी तयारी करून, डाळ वांगं करायला लावलं होतं. अफलातून चव.  साधे पदार्थ वापरून अशी चव कशी आणायची तिची तीच जाणे.
आईची एकसष्ठी केली तेव्हा तिला निरोगी दीर्घायुष्य चिंतण्याप्रीत्यर्थ सत्यनारायण केला होता. आईच्या पोरक्या आयुष्यात मायेची पखरण करणारी आजी म्हणून सत्यनारायण आजी नानांच्या हस्ते पुजला. आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायला समस्त मावस मंडळी उपस्थित होती त्यामुळे आईही मनापासून आनंदली.
आजी शेवटची काही वर्ष जागेवर होती पण असली भन्नाट तेजस्वी दिसायची.  नाना, शाम मामा, सृजा मामी, मुलं यांनी खूप मनापासून सगळं केलं तीचं. आईला "कुसुमे तुझी एखादी सुती साडी आण गं, मला पांघरायला आवडते " म्हणायची.  आजी, आई, मावशीने वापरलेल्या सुती साडीत ऊब असतेच, तीच आजीला आईच्या साडीत मिळायची बहुदा. तिची खरी नव्हे पण तशी म्हणलं तर मोठी लेकच माझी आई. आजीचे बरेचसे गुण आईत तंतोतंत उतरले होते. प्रसन्नता, उरक, उत्साह , पाककला, आहे त्याच्यात समाधानी तर राहायचं पण पुढे काहीतरी करत राहण्याची धडपड, सगळं तसं. या दोघी मावशी भाचीला काहीसं अनवट चालीचं जीवन गाणं आलं पण काय सुरेल गायलं त्यांनी🙏

No comments: